रस्त्याची दुर्दशा : वीज आणि सांडपाण्याचा प्रश्न गंभीर नेर : शहरासह तालुक्यात निर्माण झालेल्या विविध समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे. रस्ते, वीज, सांडपाण्याच्या नाल्या या समस्यांना तोंड देता देता नागरिकांना नाकीनऊ येत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न निकाली काढला जात नसल्याने रोष व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गिट्टी उखडली आहे. यावरून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. अशात नियंत्रण सुटल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक ठिकाणी अनियमित आणि कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. या प्रकारात दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत आहे. शिवाय शेती पिकाला पाणी देण्याचाही प्रश्न आहे. उद्योग-व्यवसायावरही परिणाम होत आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठाही प्रभावित होत असल्याचे सांगितले जाते. सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने जागोजागी गटारं तयार झाले आहेत. ज्या ठिकाणी नाल्या आहेत त्या नियमित उपसल्या जात नाही. त्यात अडलेल्या पाण्याची दुर्गंधी आणि डासांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि पदाधिकारीही हा प्रश्न सोडविण्यात चालढकल करत आहे. या सर्व समस्या निकाली काढाव्या, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी) पदाधिकारी गुंतले निवडणूक कामात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे परिसराशी संबंधित प्रतिनिधी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. एखाद्याकडे समस्या मांडल्यास आचारसंहिता लागल्याचे कारण पुढे केले जाते. वास्तविक पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी साधारण स्वरूपाच्या समस्याही निकाली काढण्यासाठी चांगले प्रयत्न केले नाही. त्यामुळे आता नागरिकांना साध्या-साध्या समस्या सोडवून घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामसेवकही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे या समस्या आणखी किती दिवस रखडून राहणार हा प्रश्न आहे. तालुका प्रशासनाकडून ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने कुठल्याही हालचाली होत नाही. आता नागरिकांना नवीन सदस्यांचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नेर परिसरातील समस्या दुर्लक्षित
By admin | Updated: January 16, 2017 01:12 IST