मध्यरात्री बैठक : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खल यवतमाळ : जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची बनलेल्या बोरी-अरब शेतकरी सहकारी सूत गिरणीसाठी सर्वच प्रमुख नेत्यांकडून एकत्र बसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी असे समीकरण जुळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर काँग्रेसकडूनही तडजोडीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. बोरीअरब शेतकरी सूत गिरणीत स्पष्ट सत्ता मिळूच नये, असा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होत आहे. वाटाघाटीने आलेली सत्ताच सर्वांना सोयीचे वाटत आहे. त्यामुळेच गुरूवारी रात्री राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरीया यांच्या निवासस्थानी सुरवातीला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर पालकमंत्री संजय राठोड, भाजपाचे आमदार मदन येरावर यांच्यात गुफ्तगू झाले. २१ संचालक असलेल्या सूत गिरणीमध्ये काँग्रेस - शिवसेना युतीची सत्ता होती. यात काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी नऊ सदस्य तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. सूत गिरणी सुरू करण्यासाठी निवडणूक टाळत असल्याची सबब पक्षांच्या प्रमुखांकडून सांगितली जात आहे.शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच हरू सहाकारी सोसायटीतून सूत गिरणी प्रतिनिधी म्हणून आमदार ठाकरे यांची झालेली निवड रद्द करण्यासाठी प्रयत्न केले होते. यावरून ही निवडणूक चांगलीच चूरशीची होईल, असा अंदाज होता. मात्र गुरूवारी रात्री झालेल्या बैठकीने हा अंदाज पुर्णत: खोटा ठरला आहे. बंद सूत गिरणीवर सत्ता काबीज करून करायचे काय, याचाच विचार करत आहे. शिवाय भाजपाचा येथे एकही सदस्य नाही. मात्र राष्ट्रवादीच्या मध्यस्थीने भाजप यावेळेस सूत गिरणी येण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ताधारी आमदार मदन येरावारांसाठी जागा सोडण्यास सर्वच पक्षांच्या नेत्यांची तयारी आहे, असे असले तरी सूत गिरणीच्या निवडणुकीचा अंतिम फॉर्म्युला ठरलेला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
ंबोरीअरब सूत गिरणीसाठी वाटाघाटी
By admin | Updated: February 27, 2016 02:47 IST