राजीनाम्याची प्रतीक्षा : माजी मंत्री म्हणतात ‘चार दिवस वाट पाहा’पांढरकवडा : ठरल्याप्रमाणे येथील नगर परिषदेच्या अध्यक्षा वंदना रॉय यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ काल ३० सप्टेंबर रोजी संपुनही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पुढील सव्वा वर्षे त्याच या पदावर कायम राहतात की, पुन्हा काही राजकीय घडामोडी घडतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषदेच्या विद्यमान अध्यक्षा वंदना रॉय यांच्या पदाला गेल्या ३० सप्टेंबर रोजी सव्वा वर्ष पूर्ण झाले. ठरल्याप्रमाणे त्या या पदाचा राजीनामा देतात की, पुन्हा या पदावर कायम राहतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले होते. परंतु ३० सप्टेंबर उलटूनही त्यांनी या पदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे आता उर्वरित सव्वा वर्षे त्याच या पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. परंतु माजी मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी मात्र ठरल्याप्रमाणेच होईल, चार दिवस वाट पाहा, असे ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले. त्यामुळे पुढील चार दिवसात काय राजकीय घडामोडी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सव्वा वर्षानंतर म्हणजे डिसेंबर २०१७ मध्ये नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सद्य:स्थितीत नगर परिषदेमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे लागले आहे. डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस व पारवेकर गट युतीचे १७ पैकी १३ सदस्य निवडून आले होते. अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे काँग्रेसचे गटनेते शंकर बडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. हद्दवाढ झाल्यामुळे मागील दीड वर्षापुर्वी म्हणजे २२ एप्रिल २०१५ रोजी दोन सदस्यांसाठी निवडणुक झाली. सदस्यसंख्या १७ वरुन १९ झाली. या दोन्हीही जागा काँग्रेसने पटकाविल्या. त्यामुळे सत्तारुढ काँग्रेस व पारवेकर गट यांच्याकडे १९ सदस्यांपैकी १५ सदस्य आहेत. अडीच वर्षानंतर आरक्षणानुसार अध्यक्षपद हे महिलासाठी राखीव झाले. अडीच वर्षानंतर शंकर बडे यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यामुळे महिला नगराध्यक्षा कोणाला करायचे, याबाबत काँग्रेसमध्ये एकमत होत नव्हते. या पदासाठी वंदना रॉय व पूजा भोयर या दोघींनीही दावा केला होता. शेवटी शिवाजीराव मोघे, अण्णासाहेब पारवेकर काँग्रेसचे गट नेते शंकर बडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्याची बैठक होऊन दोन दावेदार महिला सदस्यांना प्रत्येकी सव्वा सव्वा वर्ष नगराध्यक्ष पदाची संधी देण्याचे ठरले. यापैकी जेष्ठ सदस्य वंदना रॉय या पहिल्या सव्वा वर्ष व पूजा भोया या पुढील सव्वा वर्ष अध्यक्षपदी राहतील, अशी राजकीय तडजोड झाली. त्यानुसार वंदना रॉय या ३० जून २०१५ रोजी अध्यक्षपदी विराजमान झाल्या. नगराध्यक्षपदावर आरुढ होण्याला काल ३० सप्टेंबर रोजी त्यांना सव्वा वर्ष पूर्ण झाले. परंतु ठरल्याप्रमाणे त्यांनी अद्यापपर्यंत राजीनामा दिला नाही. त्यामुळे उर्वरित सव्वा वर्षे या पदावर कायम राहण्याची त्यांची इच्छा आहे, हे स्पष्ट होते. परंतु शिवाजीराव मोघे यांनी सांगीतल्यानुसार पुढील चार दिवसात काय घडामोडी होतात, याकडे आता लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - नगराध्यक्ष वंदना रॉयआपल्या नगराध्यक्षपदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला असला, तरी पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. सव्वा-सव्वा वर्ष नगराध्यक्षपद वाटून घेण्याची तडजोड केव्हा झाली, हे आपल्याला माहितच नाही. शिवाय आपल्याला पदाचा राजीनामा देण्याबाबतसुध्दा कोणीही सांगीतले नाही. आमचे नेते शिवाजीराव मोघे, शंकर बडे तसेच सलीम खेतानी हे जे निर्णय घेतील, त्यानुसार आपण निर्णय घेऊ. त्यांचा निर्णय शिरसावंद्य राहील, असे विद्यमान नगराध्यक्ष वंदना रॉय यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
नगराध्यक्षांच्या नकारघंटेने संभ्रम
By admin | Updated: October 2, 2016 00:19 IST