मंगलाताई शाह : ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ उपक्रमयवतमाळ : समाजात आजही एचआयव्ही/एड्स विषयी पुरेशी जागृती नाही. गैरसमज खूप आहे. या व्याधीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांना अक्षरश: कोठेही टाकून दिले जाते. या अनाथ बालकांना समाज वाळीत टाकतो. त्यांना केवळ सहानुभूतीची गरज नाही, तर त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी हवी आहे. त्यांची ऊर्जा टिकविण्यासाठी गरज आहे ती मायेची, थोडासा आधार आणि प्रोत्साहनाची. यासाठी समाजाने आपल्या कुटुंबापुरता विचार न करता मातृत्त्वाचा परिघ वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या संस्थापक संचालिका आणि ‘पालवी’ या विशेष बालकांच्या संगोपन प्रकल्पाच्या समन्वयक मंगलाताई शाह यांनी केले.स्वप्नवेड्या माणसांशी प्रेरणादायी संवादाचा मासिक कार्यक्रम अंतर्गत प्रयास-सेवांकूर अमरावतीद्वारा डॉ. अविनाश सावजी प्रेरित ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ या उपक्रमाचे नववे पुष्प मंगलाताई शहा यांनी रविवारी येथील नंदूरकर विद्यालयाच्या क्रीडारंजन सभागृहात गुंफले. अनाथ मुलांबरोबरच अनाथ महिलांसाठीही काम करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. समाजकार्यासाठी मदत मागण्याची लाज वाटता कामा नये यासाठी कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकर्त्यांनी पदराची झोळी धरली होती. त्यात उपस्थितांनी यशाशक्ती मदत टाकली. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, कचरा कुंडी, स्मशानभूमीत टाकून दिलेल्या अनाथ एचआयव्ही बालकांना त्यांचे मुलभूत हक्क मिळावे म्हणून ‘पालवी’ धडपडत आहे. पालवीत मुलांना पोषक आहार, प्राथमिक शिक्षण आणि आवश्यक आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. साधारणत: १३ वर्षांपूर्वी मंगलाताई शहा यांनी पंढरपूर येथे बालकांच्या संगोपनासाठी पालवीची स्थापना केली. कोणत्याही अनुदानावर अवलंबून न राहता आज या प्रकल्पात ७२ बालके आनंदाने वाढत आहेत. सर्वांना आधार देणे शक्य नसले तरी कमीतकमी ५०० बालकांचा निवासी प्रकल्प सुरू करण्याच्यादृष्टीने ‘पालवी’ प्रयत्नशील आहे. त्यासाठी समाजाने आपापल्यापरीने मदत करावी, असे आवाहन मंगलातार्इंनी यावेळी केले. संचालन आणि आभार निखिल परोपटे यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)
मातृत्वाचा परिघ वाढविण्याची गरज
By admin | Updated: December 15, 2014 23:09 IST