राळेगाव : वाघ गावात शिरल्याच्या दहशतीने राळेगावकरांनी बुधवारी अख्खी रात्र जागून काढली. तब्बल अडीच तासांच्या शोध मोहिमेनंतरही वाघ गवसला नाही. मात्र वाघाच्या दहशतीने नागरिकांना रात्रभर जागली करावी लागली. बुधवारी रात्री ११ वाजताची वेळ. अनेक युवकांचे जत्थे यावेळी पोलीस ठाण्यात दाखल झाले. गावात वाघ शिरल्याची आरोळी त्यांनी ठोकली अन् अर्धे गाव खडबडून जागे झाले. जो-तो पोलीस ठाण्याकडे धाव घेवू लागला. तेथे काय झाले म्हणून सर्व चर्चा करू लागले. यातून नेमके काय घडले, ते कळले. त्याचे झाले असे की, शहरातील काही युवक रात्री दुचाकी रस्त्याच्याकडेला उभी ठेवून रावेरी चौफुलीवर उभे होते. अचानक रावेरी रस्त्यावरून दूरसंचार कार्यालयाच्या भींतीमागे उभ्या ठेवलेल्या दुचाकी जवळून वाघ सुसाट वेगाने निघून गेल्याचे त्यांच्या वाटले. त्या युवकांनी क्षणाचाही विलंब न लावता मुख्य बाजारपेठ गाठली. तेथे आणखी कात्री मित्रांना पाचारण करून थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने युवक व नागरिकांच्या मदतीने दूरसंचार टॉवरच्या मागे शोध मोहीम सुरू केली. मात्र अंधार व वाढलेल्या गवतामुळे तब्बल अडीच तासानंतरही तेथे काहीच आढळले नाही. रात्री ३ वाजतापर्यंत सहायक ठाणेदार अशोक सोळंकी, पोलीस कर्मचारी, युवक वाघाचा शोध घेत होते. मात्र शेवटपर्यंत वाघ खरच गावात शिरला की नाही, हे कळूच शकले नाही. शहरात ही वार्ता पसरताच रात्रभर नागरिक दहशतीत होते. अनेकांनी रात्रभर जागली करून आपापली काळजी घेतली. गुरूवारी सकाळी पुन्हा घटनास्थळी पाहणी केली असता, तेथे काहीच आढळून आले नाही. मात्र राळेगावात वाघ शिरला या वार्तेने लगतच्या रावेरी, सावंगी, वाऱ्हा येथील ग्रामस्थांनाही जागली करावी लागली. (प्रतिनिधी)तालुक्यात दहशत या वाघाची संपूर्ण राळेगाव तालुक्यातच दहशत निर्माण झाली आहे. महिनाभरापूर्वीच माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनाही वाघाचे दर्शन झाले होते. या वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
लगतची गावेही जागीच : तब्बल अडीच तास शोधमोहिम
By admin | Updated: October 21, 2016 02:13 IST