नेर : पक्षात होत असलेली घुसमट यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भगवा खांद्यावर घेतला. काही वर्षांपूर्वी बाबू पाटील जैत यांनी राष्ट्रवादी सोडली होती. यानंतरही या पक्षात कार्यकर्त्यांना समाधानाची वागणूक मिळाली नाही. परिणामी विविध संस्थांचे पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले आहे. तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विविध संस्थांवर या पक्षाचे वर्चस्व आहे. एवढेच नव्हेतर नगरपालिका त्यांच्याकडे आहे. काही दिवसातच ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुका तालुक्यात होणार आहे. शिवसेनेचे वर्चस्व पाहता कार्यकर्त्यांचा लोंढा तिकडे चालला आहे. हा लोंढा थांबविण्यासाठी राष्ट्रवादीकडून काहीऐक प्रयत्न झाले नाही. उलट कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जावू लागली. घुसमट होत असल्याने अखेर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीत आत्मा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील गोळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबाराव भगत, रमेश पाटील काळे, सूत गिरणीचे संचालक शिवनाथ डोंगरे, अण्णा जगताप, हेमराज गोल्हर, अशोक मोहोड, संजय विटेवार, वटफळी सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण लोढा, साहेबराव वागजाळे, गोविंद चव्हाण, भीमराव गावंडे, उमेश पाटील गोळे, चिखली सोसायटीचे अध्यक्ष नितीन बोकडे, चिचगाव सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव चांभारे, नामदेव महल्ले, श्रीकृष्ण गावंडे, माणिकराव ढोरे, प्रशांत पाटील गावंडे, लोमहर्ष गायनर, राजूसिंग चव्हाण, राजेंद्र राऊत, किशोर गावंडे आदींनी शिवसेनेत आपला प्रवेश जाहीर केला. यावेळी बापू पाटील जैत, नगराध्यक्ष पवन जयस्वाल, स्रेहल भाकरे, तालुका प्रमुख गजानन भोकरे, शहर प्रमुख संजय दारव्हटकर, भाऊराव ढवळे, गुलाबराव महल्ले, नितीन माकोडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याने मोठे खिंडार पडले आहे. (तालुका प्रतिनिधी)
नेर तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार
By admin | Updated: February 4, 2015 23:23 IST