‘उलाढाल’ व्यर्थ : मते खेचण्यात गर्दी अपयशी यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बालेकिल्ल्यातच सर्वाधिक माघारल्याचे दिसून येते. गेली पाच वर्षे भाजप, शिवसेना, काँग्रेस या सर्वच पक्षात प्रचंड गटबाजी आणि शुकशुकाट पाहायला मिळत होता. पक्षाचा कार्यक्रम नाही की कार्यकर्त्यांचे उपक्रम नाही. अलीकडे तर विरोधी पक्षांची जनतेच्या प्रश्नावरील आंदोलनेही बंद झाली होती. मात्र राष्ट्रवादी याला अपवाद ठरली. या पक्षाचे संपूर्ण पाचही वर्षे काही ना काही उपक्रम सुरूच होते. कार्यकर्त्यांची वर्दळ, एकजूट सातत्याने पाहायला मिळत होती. ही एकजूट राष्ट्रवादीचे नेते संदीप बाजोरिया यांनी आपल्या राजकीय कौशल्याने घडवून आणली होती. गेल्या पाच वर्षात कार्यकर्त्यांची सर्वाधिक फौज त्यांच्याचकडे असल्याचे सातत्याने दिसून येत होते. यासर्व फौजेच्या बळावरच संदीप बाजोरिया यांनी विधानसभेच्या आखाड्यात यवतमाळ मतदारसंघातून उडी घेतली. त्यांच्या कार्यालयासमोरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी, वर्दळ, उठ-बस, कार्यकर्त्यांना कामांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आर्थिक सोर्स, थेट उपमुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक़, त्या माध्यमातून खेचून आणला जाणारा विकास निधी आदी जमेच्या बाजू लक्षात घेता संदीप बाजोरियाच विजयी होतील, असा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा होता. मतदारांनाही तसाच विश्वास वाटत होता. कारण तेवढीच मोठी ‘उलाढाल’ही याच ‘विश्वासू’ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाल्याची चर्चा होती. मात्र निवडणुकीचे निकाल हाती आले आणि सर्वांच्याच भ्रमाचा भोपळा फुटला. राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघात तब्बल पाचव्या स्थानावर फेकली गेली. बूथ निहाय मतदानाचे अवलोकन केले असता पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी माघारल्याचे चित्र आहे. यवतमाळ शहरातच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सर्वाधिक फटका बसला. वडगाव रोड परिसर पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांमुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्या भागातील ४४ मतदान केंद्रांपैकी केवळ एका मतदान केंद्रावर राष्ट्रवादीला तीन अंकी मते मिळविता आली. (जिल्हा प्रतिनिधी)
बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी गारद
By admin | Updated: October 21, 2014 22:58 IST