के.एस. वर्मा - राळेगावतालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा पीक घेण्यासाठी लागलेला खर्चही निघाला नाही. अशाही स्थितीत जिल्हा बँकेकडून कर्जाची वसुली केली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील आठ हजार ७११ थकबाकीदार शेतकऱ्यांकडून ३६ कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी बँकेचे अधिकारी आता सज्ज झाले आहे. तालुक्याची आणेवारी ५० पैशाच्या आत आली असली तरी वसुली थांबविण्याबाबतचे आदेश बँकांना आलेले नाही. संस्था, शाखा, तालुका, जिल्हास्तरावर टॉप २५ थकीत सभासदांवर प्रथम प्राधान्याने कारवाई करण्याची तयारी झाली आहे. संबंधितांना या पूर्वीच विविध प्रकारच्या कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहे. थकीत सभासदांची जंगम, स्थावर मालमत्ता जप्ती, विक्री आणि विक्री न झाल्यास मालमत्तेची संस्थेच्या नावे फेरफार करून विक्री करणे आदी कारवाई यावेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या ऊरात धडकी भरली आहे. सरासरी केवळ ४२ हजार रुपयांच्या वसुलीपोटी आता आपली इभ्रत चव्हाट्यावर येणार असल्याने शेतकरी आतल्या आत खचत चालला आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी जप्ती, लिलाव, फेरफार आदी टोकाची कारवाई वेळोवेळी केली आहे. पण शेतकऱ्यांची म्हणविल्या जाणाऱ्या सहकारी बँकेने एवढे टोकाचे पाऊल पहिल्यांदाच उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये या बँकेचे संचालक आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. यावर्षी सोयाबीन एकरी क्विंटलने नव्हेतर किलोने झाले. कापसाचे उत्पादन जेमतेम आहे. भाव दबलेले आहे. या स्थितीत निवडणूक काळात काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सक्तीची वसुली थांबविण्याची विनंती केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडेही बँकेने दुर्लक्ष केले असल्याचे आतापर्यंतच्या हालचालीवरून दिसून येते. बँकेने कर्ज दिले ते वसूल करण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यातच सहकार विभाग, सहकार विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. त्यातच पहिल्या २५ टॉप सभासदांवर कारवाई सुरू करताच इतर थकीत संचालक मुकाट्याने बँकेची वसुली देतील, अशी चर्चा बँकेत दबल्या आवाजात सुरू आहे. राळेगाव तालुक्यात ४६ ग्रामविविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आहे. या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, वसुलीसंदर्भात जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (वसुली) संपर्क केला असता वसुली थांबविण्याबाबत कुठलेही आदेश नसल्याचे सांगण्यात आले.
नापिकीतही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर वसुलीचे भूत
By admin | Updated: November 19, 2014 22:48 IST