महायुतीचा झंझावात : सहकारातील सत्तेचाही आघाडीला फायदा नाही
सुरेंद्र राऊत - यवतमाळ
गल्ली ते दिल्लीत सत्ता असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाला. जिल्ह्यात या दोन्ही पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारावरही वर्चस्व आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांची आपल्या क्षेत्रात किती पकड आहे, हे उघड झाले. स्वराज्य संस्थेतील मोहरेही निवडणुकीत नामोहरम झाल्याचेच दिसत आहे. सत्तेचं जाळ विणताना अगदी ग्रामपंचायतीपासून सुरूवात केली जाते. गेली अनेक वर्ष नेहमीच सत्तेच्या जवळ असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोधकांना आपल्या बलस्थानाजवळ येऊच दिले नाही. काही झाले तरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील दबदबा कायम ठेवण्यासाठी जीवचा आटापीटा स्थानिक नेत्यांकडून केला जातो. या सर्व संस्थामध्ये सर्वाधिक सदस्य काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. शिवसेना, भाजपा आणि इतर पक्षासह अपक्ष सदस्यांची गोळा बेरीज केल्यानंतरही या दोन पक्षाची बरोबरी करू शकत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्षात कार्यकर्तेच नाही. निवडणूक आली की, उभा असलेला उमेदवार पेड कार्यकर्ते उभे करतात. तसेच स्वपक्षातीलच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना आवश्यक ती रसद देऊन माहोल तयार करायचा अशी प्रथा पडली आहे. बरेच दिवस काँग्रेसचे उमेदवार लोकसभा निवडणूकीच्या काळातही घराबाहेर पडत नव्हते. तेव्हाही प्रचंड मताधिक्य त्यांच्या पदारात पडत होते. ते केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्याच्या प्रभावामुळेच शक्य होत होते. मात्र त्याकाळात प्रत्येक काम हे शब्दावर केले जात होते. नंतर नेत्यांनीच आॅफर देणे सुरू केल्याने पक्षांतर्गतच आर्थिक व्यवहार सुरू झाला. पक्षासाठी नव्हे तर स्वहीतासाठी काम करणार्यांची संख्या वाढली. आजही याला अपवाद आहेत. त्यांनीच आपल्या कार्यक्षेत्रातून मतदान काढून बुज राखली.