अखिलेश अग्रवाल - पुसदनाईक घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या पुसद मतदारसंघावर नाईकांचे एकछत्री राज्य असले तरी शहरातील मतदारांनी मात्र नाईकांना भरघोस मते दिली नाही. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुसद शहरानेही मनोहरराव नाईकांना विक्रमी आघाडी दिली. तब्बल पाच हजार ७१५ मतांची आघाडी या शहरात मिळाली. १९५२ मध्ये पुसद मतदारसंघ अस्तित्वात आला. २६ वर्ष वसंतराव नाईक, १९ वर्ष सुधाकरराव नाईक यांनी प्रतिनिधीत्व केले. १९९५ पासून मनोहरराव नाईक प्रतिनिधी करीत आहे. एकंदरितच ६२ वर्षांपासून नाईक घराण्याचा दबदबा या मतदारसंघावर कायम आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पुसद शहरात मात्र नाईक घराण्याला कधी आघाडी मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी यांना पुसद शहरात पाच हजाराची आघाडी होती. पुसद शहराने नेहमीच विरोधकांच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र विधान सभेच्या निवडणुकीत पाच हजार ७१५ अशी आघाडी नाईकांना मिळाली. पुसद विधानसभा मतदारसंघात मनोहरराव नाईक यांना ९४ हजार १५२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रकाश देवसरकर यांना २८ हजार ७९३ मते मिळाली. संपूर्ण मतदारसंघात ६५ हजार ३५९ मतांची आघाडी मिळाली आहे. अशीच आघाडी पुसद शहरातही मनोहरराव नाईक यांना मिळाली आहे. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक या दिग्गजांनी ४५ वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. पण त्यांना पुसद शहरात आघाडी मिळाली नाही. ती यंदा मनोहरराव नाईकांनी शहरात विक्रमी आघाडी घेतली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहरराव नाईक पुसद शहरातील ४८ मतदान केंद्रापैकी १३ केंद्रावर मागे आहे. तर सेनेचे प्रकाश पाटील चार ठिकाणी व भाजपाचे वसंतराव पाटील कान्हेकर नऊ ठिकाणी आघाडीवर आहे. काँग्रेसचे अॅड. सचिन नाईक यांना शहरातील वसंतनगर, गढीवार्ड या भागात आघाडी मिळाली नाही. या दोनही ठिकाणी राष्ट्रवादीचे मनोहरराव नाईक यांना मते दिली. ६२ वर्षात पुसद शहरात प्रथमच आघाडी मिळविण्यामागे शहरी मतदारांचा विश्वास संपादन करण्यात नाईकांना यश आल्याचे दिसत आहे. माजी नगराध्यक्ष सतीश बयास, माजी उपाध्यक्ष डॉ. अकील मेमन, पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, इंद्रनिल नाईक, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, के.डी. जाधव, जयवंतराव पाटील, पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांच्यासह इतर नेते, पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून प्रचारात समन्वय व एकत्रीकरणातून पुसद शहरात मनोहरराव नाईकांना विक्रमी आघाडी मिळवून दिली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पुसद शहरात नाईकांना विक्रमी आघाडी
By admin | Updated: October 20, 2014 23:19 IST