अखिलेशकुमार सिंह यांची बदली : पण नव्या नियुक्तीची प्रतीक्षा, राजकीय नाराजी भोवली यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची अखेर येथून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नवे पोलीस अधीक्षक म्हणून नागपूरच्या परिमंडळ क्र. ३ चे पोलीस उपायुक्त एम. राजकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी अखिलेशकुमार सिंह यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. मात्र अद्याप त्यांना कोठेही नियुक्ती न देता प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. बुधवारी राज्य पोलीस दलातील एसपी-उपायुक्त दर्जाच्या १७ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले. त्यात सिंह यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाची धुरा आता डीसीपी एम. राजकुमार यांच्या खांद्यावर राहणार आहे. ते २०१० च्या बॅचचे थेट आयपीएस आहेत. अखिलेशकुमार सिंह यांच्या बदली मागे सत्ताधारी भाजपाच्या एका नेत्याची नाराजी हे प्रमुख कारण सांगितले जाते. भाजपाचे एक नेते एसपींच्या विरोधात असताना याच पक्षाच्या अन्य एका बड्या नेत्याने पाठबळ देऊन वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळेच सिंह यांच्या बदलीला काहीसा विलंब लागल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात सर्वाधिक वर्चस्व असताना भाजपाला कमी लेखणे आणि शिवसेनेला झुकते माप देणे यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनावर भाजपाच्या नेत्याची नाराजी वाढल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जाते. ठाणेदारांच्या अधामधात बदल्या करणे, पोलीस दलात अधिकाऱ्यांमध्ये फोफावलेली गटबाजी, अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण याबाबीही सत्ताधारी पक्षाच्या नाराजीला तेवढ्याच कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. अखिलेशकुमार सिंह यांनी जिल्ह्याची सूत्रे स्वीकारताच पांढरकवडा रोडवरील पोलीस चौकीनजीक चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड घालून प्रचंड खळबळ निर्माण केली होती. परंतु नंतरच्या काळात ही खळबळ पुन्हा पहायला मिळाली नाही. उमरखेडमध्ये गणेशोत्सव मिरवणुकीवर झालेली दगडफेक, पुसदमध्ये गणेश मंडळांमध्ये झालेली भांडणेसुद्धा बदलीला कारणीभूत ठरली. (जिल्हा प्रतिनिधी)
नागपूरचे एम. राजकुमार जिल्ह्याचे नवे ‘एसपी’
By admin | Updated: January 5, 2017 00:12 IST