यवतमाळ : नागपूर क्राईम ब्रँचने उघडकीस आणलेल्या एका प्रकरणाचे तार यवतमाळात असल्याच्या माहितीवरून शहर पोलिसांच्या मदतीने मंगळवारी सायंकाळी पिंपळगाव परिसरातील विसावा कॉलनीत धाड टाकली. तेथे एका महिलेसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले. निराधार अल्पवयीन मुलींना वाईट मार्गाला लावणाऱ्या टोळीचा छडा नागपूर क्राईम ब्रँचने लावला आहे. एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नागपुरातील मनीषनगर येथील आरोपी स्वरूप नरेश लोखंडे याला अटक केली. स्वरूपने सदर मुलीला अडीच वर्षापूर्वी फूस लावून पळविले होते. नंतर बेवारस सोडून दिले. तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन ११ जणांच्या टोळक्यांनी तिला अवैध व्यवसायात ओढले. तिचीच मैत्रीण यवतमाळात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणाचा तपास करीत असताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश चौधरी व त्यांच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने पिंपळगावातील विसावा कॉलनीतून विजया नामक महिलेला ताब्यात घेतले. तिच्यासोबत तिची अल्पवयीन मुलगी आणि पीडित मुलीलाही पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला आहे. यवतमाळात झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
नागपूर पोलिसांनी महिलेला घेतले ताब्यात
By admin | Updated: September 9, 2015 02:31 IST