दुष्काळाची पाहणी : पथक न थांबल्याने शेतकरी संतप्त यवतमाळ : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेले पथक शेतकऱ्यांना वाकुल्या दाखवित निघून गेल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथे चक्काजाम केला. यामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान दुसऱ्या पथकाने कळंब आणि बाभूळगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे वास्तव अनुभवले. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी केंद्राचे पथक जिल्ह्यात येणार होते. एक पथक अमरावती जिल्ह्यातून बाभूळगाव तालुक्यात दाखल झाले. त्यांनी दोन तालुक्यांची पाहणी केली. तर दुसरे पथक मराठवाड्यातून येणार होते. उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शेताची पाहणी करणार होते. सायंकाळी ५ वाजता पथक उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथे येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे दुपारपासूनच शेकडो शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते. सायंकाळी अंधार पडला तरी पथक पोहोचले नव्हते. शेकडो शेतकरी पथकाची प्रतीक्षा करीत होते. ७.३० वाजताच्या सुमारास पथक नागेशवाडीच्या जवळ आले. परंतु निर्धारित शेतात न थांबता पथक नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गाने सरळ निघून गेले. पथक थांबले नसल्याने शेतकरी संतप्त झाले. तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला. त्यामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पथकाने आमचा अपमान केला. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ सुरू आहे, असा सवाल शेतकरी करीत होते. दरम्यान चक्काजाममुळे राज्य मार्गाच्या दोनही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तहसीलदार सचिन शेजाळ आणि कृषी अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. पथक येत नाही तोपर्यंत चक्काजाम सुरूच राहील, असा निर्धार या शेतकऱ्यांनी केला. वृत्त लिहिस्तोवर हजारो शेतकरी रस्त्यावर ठिय्या देऊन बसले होते. दरम्यान महागाव तालुक्यातील मुडाणा येथे दुपारपासून शेतकरी पथकाची प्रतीक्षा करीत होते. ८ वाजेपर्यंत पथक पोहोचले नव्हते. दुष्काळाचे वास्तव दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी बॅटरीवर लाईट शेतामध्ये लावले होते. (लोकमत चमू)कळंब, बाभूळगावमध्ये पाहणी दुसरे पथक अमरावती जिल्ह्यातून बाभूळगाव तालुक्यातील नायगाव येथे दाखल झाले. या पथकात केंद्र सरकारच्या कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी.सिंग, पशुसंवर्धन आयुक्त चंद्रशेखर साहूकार, भारतीय खाद्य निगमचे सहसंचालक सुधीरकुमार, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहायक सल्लागार विजयकुमार बातला यांच्यासोबत राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव मंदार पोहरे, अवर सचिव श्रीरंग घोलप यांचा समावेश होता. तर पथकासोबत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, उपायुक्त रवींद्र ठाकरे, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे, तहसीलदार किरण सावंत पाटील, संतोष काकडे, मोहन जोशी उपस्थित होते. या पथकाने बसस्थानकाजवळ असलेल्या शंकर नागोसे यांच्या शेताची पाहणी केली. नागोसे यांनी दुष्काळाने उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. सात एकरात एक क्ंिवटल सोयाबीन आणि चार क्ंिवटल कापूस झाल्याचे पथकाला सांगितले. सर्वप्रथम नायगावचे पोलीस पाटील मोहन कापसे यांनी केंद्रीय पथकासमोर कर्जमाफी व विज बिल माफ करण्याची मागणी केली. यानंतर सतीश मानलवार यांनी कापसाचे भाव कमी आणि बियाण्यांचे भाव वाढत असल्याचे सांगितले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यांना मदत करण्याची मागणी केली. यावेळी डॉ. कृष्णा देमगुंडे, सरपंच आशिष गावंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य हिंमत पांडे, संजय पांडे, अमोल कापसे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. त्यानंतर सदर पथक कळंब तालुक्याकडे रवाना झाले. कळंब तालुक्यातील गांधा गावातील शेतकरी श्रीराम कांबळे यांचे शेत व रामजी टेकाम यांच्या विहिरीची पाहणी केली. यावेळी परिसरात जमलेल्या शेतकऱ्यांनी शेतीची विदारकता कथन केली. पथकाने शेतकऱ्यांचे विदारक वास्तव जवळून अनुभवले.
नागेशवाडीत चक्काजाम
By admin | Updated: December 16, 2014 22:59 IST