पतीने कुटुंबाशी असलेल्या जागेच्या वादातून जाळून घेवून आत्महत्या केली. त्याने हा निर्णय घेताना पत्नी व दोन मुलांचा विचार केला नाही. या धक्क्यातून सावरत वंदनाने दोन चिमुकल्यांचा सांभाळ करत त्यांच्या शिक्षणासाठी धडपड सुरू केली. गावात मिळेल ते काम करून रोजमजुरीतून ती संसाराचा गाडा चालवत होती. समाजात विधवा महिलेला आजही वेगळ्या नजरेने पाहण्यात येते. हीच कुचंबणा वंदनाच्याही वाट्याला आली. यातूनच तिचे शेजारी असलेल्या दीर व सासुशी खटके उडत होते. या भांडणाचा वाद विकोपाला गेला आणि वंदनाचा हकनाक बळी गेला. घटनेनंतर मारेकरी दीरानेच पोलिसात खुनाची फिर्याद दिली. आधुनिक युगात महिला सक्षम झाल्याचे सांगण्यात येते. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यानंतरही महिलांना समाजात समानतेचे स्थान नाही. विविध स्तरावरून व धार्मिक आधारावरून महिलांना महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात ही बाब मात्र समाजमनात आजही रुजलेली नाही. पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापुढे अनेक क्षेत्रात महिलांनी स्वत:ला सिद्ध केले. अशाही स्थितीत आपल्या समाजात स्वयंपूर्ण व स्वाभिमानाने जगणाऱ्या एकट्या महिलेकडे संशयाच्या नजरेने पाहण्यात येते. पतीच्या निधनानंतर दोन चिमुकल्यांना घेवून संसार सावरणाऱ्या हिवरा संगम येथील झोपडपट्टीतील वंदना ऊर्फ अनिता अशोक चवरे (३७) या महिलेच्या वाट्यालाही हीच संशयाची कुचंबणा आली आणि यातून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेत दोन चिमुकल्यांना मायेच्या छत्राला मुकावे लागले. कुटुंबातीलच मारेकरी असल्याने सुरुवातीला हा गुन्हा दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. पोलिसांना सत्य परिस्थिती माहीत पडू नये, यासाठी खुद्द मारेकरी दीर पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार देण्यासाठी पोहोचला. मात्र घटनास्थळावरची स्थिती आणि इतर परिस्थितीजन्य पुरावे याचे अवलोकन केल्यानंतर महागावचे ठाणेदार के.आय. मिर्झा यांना नेमका गुन्हेगार कोण, याचे आकलन झाले. शिवाय नऊ वर्षाच्या ऋतुजाने आईचा मारेकरी दुसरा कोणी नसून आपला सख्खा काकाच असल्याचे पोलिसांना सांगितले. घटनाक्रमाचा उलगडा झाल्याने रात्रीच्या खुनातील आरोपीला दुपारपर्यंत पोलिसांनी जेरबंद केले. वंदना ही पतीच्या निधनानंतर आपल्या सासरीच राहू लागली. तिने दीराच्या घराला लागूनच आपली झोपडी उभारली. तिच्या सोबत मुलगा देवानंद आणि मुलगी ऋतुजा हे दोघे राहात होते. मुलांच्या शिक्षणासाठी वंदनाची धडपड सुरू होती. गावात हाताला मिळेल ते काम करून ती उदरनिर्वाह करत असे. पतीच्या निधनासाठी कारणीभूत ठरलेला जागेचा वाद वंदनाच्याही जीवावर उलटला. २९ डिसेंबरच्या रात्री १० वाजता शेजारी राहात असलेल्या आरोपी दीर प्रकाश दगडू चवरे (२७) याने वंदनाला शिवीगाळ करणे सुरू केले. बराचवेळ हा प्रकार सुरू होता. शेवटी असह्य झाल्याने वंदना शेजारी असलेल्या दीराच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली. तिथे आरोपी प्रकाशने वंदनाला जर्मनी गंजाने मारहाण केली. त्यानंतर विळ्याने तिच्या छातीवर व डोक्यावर घाव घातले. यात तिचा जागेवरच मृत्यू झाला. आता खुनाच्या गुन्ह्यात अटक होईल या भीतीने प्रकाशने वंदनाचा मृतदेह उचलून रस्त्यावर टाकला. घरात सांडलेले रक्त व गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचे काम सासू सिंधूबाई दगडू चवरे (६५) हिने केले. खुनाची घटना घडल्याची माहिती सकाळी पोलीस पाटलाने महागाव ठाण्यात दिली. तोपर्यंत या संदर्भात तक्रार देण्यासाठी कुणी पुढे आलं नव्हतं. नंतर आरोपी प्रकाश हाच तक्रार देण्यासाठी महागाव ठाण्यात पोहोचला. त्याने या खुनात गावातील बंडू वारंगे हा आरोपी असल्याचे सांगितले. दरम्यान घटनास्थळावर पोहोचलेल्या ठाणेदार मिर्झा यांना आरोपी कोण याचा अंदाज आल्याने प्रकाशला तिथेच ठाण्यात बसवून ठेवण्याचे निर्देश दिले. नंतर मुलगी ऋतुजाच्या बयाणातून या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. दीर व सासू या दोघांवरही खून, पुरावा नष्ट करणे, खोटी तक्रार देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आई-वडील नसलेल्या चिमुकल्यांना शेंबाळपिंपरी येथील आजी-आजोबाकडे पाठविले आहे. या गुन्ह्यात खरी शिक्षाही निष्पाप चिमुकल्यांना भोगावी लागत आहे.
खुनाची फिर्याद देणारा दीरच निघाला मारेकरी
By admin | Updated: January 8, 2017 01:13 IST