रहस्य उलगडले : बेलखेडचे खूनप्रकरणउमरखेड : तालुक्यातील बेलखेड येथील खून प्रकरणाचे रहस्य उलगडले असून चुलत भावाने सुपारी देऊन दोघांच्या मदतीने हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी चुलत भावाला अटक केली असून इतर दोघांचा शोध जारी केला आहे.विलास बक्षी जाधव रा. बेलखेड असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील मरसूळ (श्री दत्तनगर) शिवारात प्रल्हाद धनू जाधव (४८) रा. बेलखेड याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. त्याचा गळा चिरुन खून करण्यात आला होता. मात्र या घटनेतील मृतकाच्या खिशातील पैसे आणि अंगावरील सोन्याचा ऐवज तसाच होता. तसेच आरोपींनी कुठलाही पुरावा सोडला नव्हता. त्यामुळे तपासाचे आवाहन पोलिसांपुढे उभे झाले होते. पैशासाठी हा खून झाला नसल्याने पोलिसांनी अनैतिक संबंधाचा कयास बांधला. त्या दिशेने तपास केला असता यात चुलत भावाचे नाव पुढे आले. पोलिसांनी गुरुवारी चुलत भाऊ विलासला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच अनैतिक संबंधातून आपण चुलत भावाचा सुपारी देऊन खून केल्याचे पुढे आले. मात्र या खुनाशी संबंधित असलेले सुपारीबाज परप्रांतात पसार झाले. दरम्यान अटक केलेल्या आरोपीला येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार शिवाजी बचाटे, सहायक पोलीस निरीक्षक सुरज बोंडे, सदाशिव भांडेकर, शबीर खान पठाण करीत आहेत. या प्रकरणातील पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी उमरखेड पोलिसांचे एक पथक रवाना झाले असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
चुलत भावाने सुपारी देऊन केला खून
By admin | Updated: October 31, 2015 00:29 IST