भारी येथे शौचालयाचे भूमिपूजनयवतमाळ : सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या यवतमाळ तालुक्यातील भारी येथील शौचालय बांधकामाचे भूमिपूजन लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी दत्तक ग्राम भारी येथील सूक्ष्म नियोजनाचा आराखडा जाणून घेतला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत भारी येथील बळीराम समर्थ यांच्याकडे शौचालय बांधण्यात येणार आहे. भारी येथे आयोजित कॅन्सर तपासणी व मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने खासदार विजय दर्डा आले असता त्यांनी या शौचालयाचे भूमिपूजन केले. तसेच भारी गावाची पाहणी केली. यावेळी बोलताना खासदार दर्डा म्हणाले, शेतीला पूरक व्यवसाय आणि गृहउद्योगाला चालना देण्यासाठी काम हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासोबत शेतीला जोडधंदा देण्यासाठी नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी दूध उत्पादनावर भर देण्याचा उपाय सुचविला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडून विविध अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, भारीचे सरपंच वासुदेव गाडेकर, रवी ढोक, पंचायत समिती सदस्य सुनील कांबळे, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
सांसद दत्तक ग्राम : गृहउद्योगाला चालना देण्याचे विजय दर्डा यांचे आवाहन
By admin | Updated: March 19, 2015 02:09 IST