अनर्थ टळला : शाळा इमारत पाडण्याचा प्रयत्न पांढरकवडा : येथील इंग्लिश मीडियम शाळेची जागा जय पेरसापेन संस्थेची असून अतिक्रमण त्वरित काढावे या मागणीसाठी रविवारी दुपारी आमदार राजू तोडसाम यांच्यासह आदिवासी बांधवांनी धडक देत शाळेची इमारत पाडण्याचा प्रयत्न केला. येथील राममंदिर जवळ असलेल्या शासकीय जागेवर १९७० मध्ये नाथार यांनी इंग्लिश मीडियम शाळा सुरू केली. यातील ५२२.५६ चौरस मीटर अतिक्रमणाखालील क्षेत्र श्री भीमालपेन देवाचे मंदिर बांधण्याकरिता शासनाने कब्जे हक्काने मंजूर केले आहे. उर्वरित जागासुद्धा शासनाने तत्वत: देण्याचे मान्य केल्याचा दावा संस्थानने केला आहे. हे प्रकरण न्यायालयातसुद्धा गेले आहे. यासाठी अनेकदा आंदोलने झाली. परंतु प्रश्न सुटला नाही. त्यामुळे आज आमदार तोडसाम यांच्यासह पेरसापेन संस्थेचे अध्यक्ष सी.जे. उईके, भाऊराव मरापे, बाबाराव सोयाम यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव शाळा परिसरात आले. शाळेचे कंपाऊंड तोडून इमारत पाडण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला. आमदार तोडसाम म्हणाले, ही जागा जय पेरसापेन संस्थेचे असून येथे समाज मंदिरासाठी निधी मंजूर झाला. परंतु अतिक्रमणामुळे निधी परत जात असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
अतिक्रमणाविरुद्ध आदिवासी बांधवांचे आंदोलन
By admin | Updated: June 13, 2016 00:51 IST