मांगलादेवीतील प्रकार : खात्यात पैसे नाहीमांगलादेवी : जननी सुरक्षा योजनेअंतर्गत एका आदिवासी दाम्पत्याला दिलेला केवळ ७०० रुपयाचा धनादेश अनादरीत झाला. संबंधित खात्यात पैसे नसल्याने हा धनादेश अनादरित झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकारामुळे आदिवासी दाम्पत्याची मात्र घोर निराशा झाली आहे.बाळंतपण सुरक्षितरीत्या रुग्णालयात व्हावे यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. यासाठी जननी सुरक्षा योजनेतून ७०० रुपयांची मदत दिली जाते. नेर तालुक्यातील मांगलादेवी येथील सुवर्णा संतोष पंधरे ही महिला गरोदर होती. तिची १२ जुलै रोजी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली. यानंतर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ७०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश वठविण्यासाठी त्यांनी मांगलादेवीच्या युनियन बँकेत खाते उघडले. त्यानंतर धनादेश जमा करण्यात आला. परंतु आठ दिवसानंतरही खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यानंतर दोन दिवसाने संबंधित खात्यात पैसे नसल्याने धनादेश अनादरित झाल्याचे सांगण्यात आले. आता या दाम्पत्याला नवीन धनादेशासाठी मजुरी बुडवून यवतमाळला जावे लागणार आहे. दुसरा धनादेश आणून तो पुन्हा बँकेत जमा करावा लागेल. जननी सुरक्षेच्या खात्यात ७०० रुपयेही नसावे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
जननी सुरक्षेचा धनादेश अनादरीत
By admin | Updated: September 12, 2016 01:17 IST