नववीच्या निकालावर नजर : मुख्याध्यापकांना मार्गदर्शन यवतमाळ : माध्यमिक शाळेतील एकही मूल शाळाबाह्य होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश मंगळवारी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना देण्यात आले. त्यासाठी ‘मदर स्कूल’ या नव्या संकल्पनेद्वारे नववीनंतरची विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचा निर्णय घेण्यात आला. ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुले शाळेत दाखल करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग धडपडत आहे. मात्र, १४ वर्षावरील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागही आता कामाला लागला असून त्यासंदर्भात मंगळवारी जिल्हाभरातील मुख्याध्यापकांची बैठक येथील नंदूरकर विद्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी उद्घाटन केले. दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याबाबत त्यांनी मुख्याध्यापकांना निर्देश दिले. माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी उपस्थित होते. यापुढे प्रत्येक शाळेचा इयत्ता नववीचा निकाल शंभर टक्के लागलाच पाहिजे, असा शासनाचा आग्रह असून त्यासाठी जलद प्रगत शैक्षणिक अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नववीनंतर कोणत्याही विद्यार्थ्याने शाळा सोडू नये, यासाठी ‘मदर स्कूल’वर जबाबदारी देण्यात आली. ज्या शाळेच्या आजूबाजूला मोठी खेडी आहेत, अशा शाळेला ‘मदर स्कूल’चा दर्जा देण्यात येणार आहे. परिसरातील खेड्यांमध्ये शाळाबाह्य राहणाऱ्या मुलांचा शोध या मदर स्कूलने घ्यायचा आहे. तसेच त्याबाबतचा प्रक्रिया अहवाल शाळेच्या दर्शनी भागात लावायचा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
‘मदर स्कूल’ रोखणार गळती
By admin | Updated: February 22, 2017 01:16 IST