अजब पवित्रा : पती, पोलिसांसमोर प्रियकरासोबत राहण्याचा निर्णयआरिफ अली बाभूळगाव प्रेमासाठी वाट्टेल ते.. हे परवलीचे वाक्य प्रत्यक्ष जगताना अनेक आयुष्य उद्ध्वस्त करीत असते. लग्नानंतर सुखाचा संसार करणाऱ्या महिलेच्या आयुष्यात एक तरुण प्रियकर आला. त्याच्यासोबत जगता यावे म्हणून चक्क आईने आपल्या दोन लेकरांनाही सोडून दिले. प्रेयसी बनलेल्या त्या महिलेतील मातृत्व हरले. एवढेच नव्हेतर, प्रत्यक्ष पती आणि पोलिसांसमोरच तिने प्रियकरासोबत राहण्याचा निर्णयही जाहीर करून टाकला...नातेसंबंधांना जबर हादरा देणारा हा प्रकार तालुक्यातील पाचखेड गावात घडला. ही विवाहिता गेल्या काही वर्षांपासून पाचखेड येथे आपल्या पतीसोबत सुखाने संसार करीत होती. त्यांच्या संसार वेलीवर दोन फुलेही उमलली. पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा यांच्या कौतुकात पती रमून गेला होता. पण या सुखी कुटुंबाचे भविष्य काळाने वेगळेच लिहिलेले होते. गावातीलच एका २२ वर्षीय तरुणासोबत विवाहितेचे सुत जुळले. भेटीगाठी वाढल्या. शेवटी हे प्रेमियुगुल पतीच्या दृष्टीस पडले. शांत स्वभावाच्या पतीने कायदा हातात न घेता प्रकरण हाताळण्याचा निर्णय घेतला. त्याने तडक बाभूळगाव पोलीस ठाणे गाठले. पत्नीच्या परपुरुषाशी असलेल्या संबंधाची माहिती लेखी स्वरुपात पोलिसांना दिली. पोलिसांनीही एक संसार मोडू नये, या भूमिकेतून पावले उचलली. संबंधित प्रियकर, विवाहित महिला आणि त्यांच्या सर्व निकटस्थ नातेवाईकांना १२ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. मात्र, सर्वांपुढे त्या विवाहितेने आपण प्रियकरासोबतच राहणार असल्याचा निर्णय बोलून दाखविला. नातेवाईकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पतीनेसुद्धा झालेल्या चुकीची माफी देऊन मुलांकडे पाहून नांदायला येण्याची विनंती केली. मात्र, प्रेमात आंधळी झालेली विवाहिता काहीही ऐकायला तयार नव्हती. शेवटी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.मुलांचा सांभाळ करणारपोटच्या पोरांना सोडून ती विवाहिता प्रियकरासोबत निघून गेली. हतबल पती दोन्ही मुलांना घेऊन गावाकडे परतला. यापुढे मुलांचा सांभाळ आपणच करणार असल्याचे त्याने नातेवाईकांना सांगितले. मात्र, या घटनेने पती-पत्नीतील विश्वासाच्या नात्याला जबर हादरा बसला.
आंधळ्या प्रेमात मातेने पोटच्या पोरांनाही सोडले
By admin | Updated: September 14, 2016 01:06 IST