फौजदारी दाखल करा : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देशयवतमाळ : शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर व्यापारीच तूर विकत असल्याचा धक्कादायक प्रकार येथील बाजार समितीत उघड झाला. या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत क्षमतेपेक्षा जादा तूर विक्री करणाऱ्यांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर व्यापाऱ्यांनी तुरी विकल्याचे खुद्द येथील बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी उघड केले. याबाबत एकाच टोकनवर तीन लिलाव झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नियमबाह्य विक्रीला चाप लावण्यासाठी ठोस निर्णय घेतले. त्यानुसार शासकीय तूर खरेदी केंद्रांना त्यांनी १० क्विंटलपेक्षा जादा तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सहाय्यक निबंधकांकडे ३० मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले. सहाय्यक निबंधकाकडे जादा तूर विक्रीबाबत प्रथम सुनावणी होईल. ते सातबारा, आठ अ, पेरेपत्रक, आधार कार्डची तपासणी करतील. त्यात शेतकऱ्याने क्षमतेपेक्षा जादा तूर विकल्याचे सिद्ध झाल्यास, त्यांच्याविरूद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहे.शासकीय तूर खरेदी केंद्रांवरील हेराफेरी थांबविण्याची जबाबदारी आता सहाय्यक निबंधकांकडे देण्यात आली. त्यांना केंद्रांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही दिल्या. यासोबत वितरित झालेल्या टोकन नंबरनुसार खरेदी होत आहे का, एकाच टोकनवर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यात आला का, याची पाहणी करण्यात येणार आहे. खरेदी होणारी तूर पात्र आहे का, शेतकऱ्यांना कुठल्या अडचणी येत आहेत का, याबद्दलही माहिती जाणून घेतली जाणार आहे. यामुळे शासकीय तूर खरेदी केंद्रांवर खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे. (शहर वार्ताहर) १६ हजार शेतकरी प्रतीक्षेत१५ एप्रिलपर्यंतच तूर खरेदी होणार आहे. दरम्यानच्या काळात अनेकदा केंद्र ठप्प पडले. त्यामुळे तूर खरेदी रखडली होती. यामुळे प्रत्येक केंद्रावर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेली तूर १५ एप्रिलपर्यंत खरेदी होणार किंवा नाही, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना पडला आहे. १५ दिवसांत १५ केंद्रांवर १६ हजारपेक्षा अधिक शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे.
जादा तूर विक्रीची चौकशी
By admin | Updated: March 31, 2017 02:15 IST