यवतमाळातील प्रकार : एसटी कामगारांमध्ये प्रचंड रोषयवतमाळ : भविष्य निर्वाह निधी खाते आॅनलाईन करण्याच्या नावाखाली एसटी कामगारांना आर्थिकरित्या लुटण्याचा प्रयत्न बुधवारी उधळण्यात आला. येथील एसटी आगारात घडलेल्या या प्रकारामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. सकाळी ११ वाजतापासून नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून १०० रुपये आणि एक पासपोर्ट फोटो घेतला जात होता. एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ईपीएफ आॅनलाईन सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे यासाठी कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत होती. हा प्रकार सर्रास कर्मचाऱ्यांची लूट करणारा असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. नोंदणी करण्यासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली, संबंधित व्यक्ती कोण, शुल्क किती आकारले जाणार या विषयीची कुठलीही पूर्व कल्पना कामगारांना नव्हती. मात्र संबंधित व्यक्तीकडून १०० रुपये आकारले जावून लॅपटॉपवर नोंदणी करण्यात येत होती. या शुल्कावर काही लोकांनी आक्षेप घेतला. एवढेच नव्हेतर भविष्यनिर्वाह निधी खाते क्रमांक आॅनलाईन करण्याची जबाबदारी महामंडळाची असल्याची बाजू मांडत सुरू असलेल्या प्रक्रियेला विरोध केला. यवतमाळ विभागात असलेल्या तीन हजार २०० कामगारांना ही प्रक्रिया करायची होती. या माध्यमातून प्रक्रिया राबविणाऱ्या संबंधित व्यक्तीला एकूण तीन लाख रुपये प्राप्त होणार होते. एवढ्या मोठ्या रकमेची उलाढाल होत असतानाही बसस्थानक प्रमुख या बाबीपासून अनभिज्ञ होते. बसस्थानकाच्या आवारात खाते क्रमांक आॅनलाईन करण्यासाठी १५ जुलै २०१५ रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, अशी सूचना तेवढी लावण्यात आली होती. खाली ‘आदेशानुसार’ एवढेच नोंदविले होते. ही सूचना लावली त्यावेळी १०० रुपये आणि रंगीत पासपोर्टसह प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे नमूद होते. मात्र कामगारांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यात खोडतोड करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार होती. मात्र सुरुवातीलाच हा प्रकार उधळला गेला. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष बंडू गाडगे यांच्यासह अनेक कामगारांनी विभागीय नियंत्रकांना या बाबीविषयी अवगत केले. मात्र त्यांनी या संदर्भात आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले, अशी माहिती गाडगे यांनी दिली. (वार्ताहर)
‘ईपीएफ’ आॅनलाईनच्या नावाखाली आर्थिक लुटीचा प्रयत्न उधळला
By admin | Updated: July 16, 2015 02:38 IST