आंदोलन समिती : विदर्भ दिंडी निघणार यवतमाळ : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ३ व ४ आॅक्टोबर २०१६ रोजी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये विदर्भ राज्याची विधानसभा (प्रतिरूप) भरविण्यात येत आहे. या दोन दिवसीय विधानसभेमध्ये विदर्भ राज्याचे फायद्याचे अर्थसंकल्प मांडून विदर्भ राज्य कसे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे आहे, हे मांडण्यात येणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, नक्षलवाद कसे संपू शकते यासह विदर्भातील विजेचे कृषिपंपाचे लोडशेडींग संपून येथील जनतेला आजच्यापेक्षा निम्या दरात वीज कशी देवू शकते, हाही निर्णय या विधानसभेत होणार आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालाला रास्त भावासह शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचाही निर्णय या विधानसभेत जाहीर करण्यात येणार आहे. सोबतच अकराही जिल्ह्याचा संतुलित विकासासह विदर्भाच्या विकासाचे मॉडेलही सादर करण्यात येईल. अखंड महाराष्ट्राची विधानसभा ५ डिसेंबरला नागपूर येथे भरणार आहे. त्या विधानभवनावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने पहिल्याच दिवशी विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या सर्व आंदोलनासाठी जनजागृती म्हणून विदर्भातील पाच सीमेवर पाच विदर्भ दिंडी यात्रा निघणार असून त्या ५ डिसेंबरला नागपूरला पोहोचतील, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अॅड.वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, अॅड.नंदाताई पराते व संध्याताई इंगोले यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)
विदर्भ राज्यासाठी भरणार प्रतिरूप विधानसभा
By admin | Updated: September 28, 2016 00:49 IST