महिना ८३ रुपये : ग्रामसेवकाकडे अर्ज करून वर्षातून दोनदा उचलावी लागते रक्कमकिशोर वंजारी नेरगावातील तंटे गावातच मिटविली जावी, यासाठी तंटामुक्त गाव समित्या तयार करण्यात आल्या आहे. या समितीच्या अध्यक्षाची मात्र मानधनाच्या बाबतीत थट्टा सुरू आहे. दरमहा केवळ ८३ रुपये मानधनावर या अध्यक्षांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. वाद गावातील असो वा कौटुंबिक त्यांच्यात समेट घडवून आणत पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण जावू नये, यासाठी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला मोलाची भूमिका पार पाडावी लागते. बऱ्याच प्रकरणात तर त्यांना वैयक्तिक रोषालाही सामोरे जावे लागते. तरीही ही जबाबदारी ते पार पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, शासनाच्या लेखी त्यांचे कार्य अतिशय थिटे मानले जात असल्याचे दिसून येत आहे. सदर योजना सुरू करताना शासनाने समितीच्या अध्यक्षांकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या. या कार्याचे मानधन त्यांना केवळ एक हजार रुपये वार्षिक जाहीर करण्यात आले. तरीही समित्यांचे अध्यक्ष जादा अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी पार पाडत आहे. मात्र आज वाढती महागाई लक्षात घेता त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, अशी अपेक्षा आहे. गावातील अवैध धंदे नियंत्रणात आणण्याची जबाबदारी पार पाडताना त्यांना मोठी जोखिम स्वीकारावी लागते. गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठीही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सरपंच, पोलीस पाटील यांच्याशी सुसंवाद साधून कुठलेही प्रकरण पोलिसात जावू नये, यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होते. मात्र त्यांचे मानधन वाढविण्याविषयी सकारात्मक विचार केला जात नसल्याचे दिसून येते. एवढेच नव्हेतर मानधनाची रक्कम ग्रामसेवकाच्या खात्यात जमा केली जावून अर्ज सादर केल्यानंतर वर्षातून एकदा ही रक्कम अध्यक्षाला मिळते.
तंटामुक्त समिती अध्यक्षांची मानधन वितरणात थट्टा
By admin | Updated: October 14, 2016 03:07 IST