यवतमाळ : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक व युवतींसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुकांना अर्ज मागविण्यात येत आहे.सदर प्रशिक्षण १ आॅगस्ट ते १ नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालावधीसाठी असून त्याकरिता जिल्ह्यातील ७० युवक व ३० युवतींची निवड करावयाची आहे. प्रशिक्षणासाठी उमेदवार या जिल्ह्याचा रहिवासी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा. वय १८ ते २५, उंची युवकांसाठी १६५ सेंमीं तर युवतीसाठी १५५ सेंमी असावी. पुरुष उमेदवारांकरिता छाती ७९ सेंमी व फुगवून ८४ सेंमी असावी. उमेदवार १२ वी पास असावा. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातील नाव नोंदणी दाखला, ओळखपत्राची सत्यप्रत आदी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षण अमरावती येथे देण्यात येणार असून प्रशिक्षण कालावधीत गणवेश साहित्य, निवास भोजनाची व्यवस्था केली जाईल. इच्छूक उमेदवारांनी ३१ जुलैपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यवतमाळ यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.
अनुसूचित जातीच्या युवकांना सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 02:31 IST