ऊसतोड हंगाम : गाव, तांडे, वाड्या-वस्त्या ओस महागाव : ऊस तोडणीचा हंगाम सुरू होताच पुसद आणि उमरखेड उपविभागातील तब्बल १० हजार मजूर पश्चिम महाराष्ट्रासह परराज्यात स्थलांतरित झाले आहे. कारखान्यांच्या ट्रकमधून शेकडो मजूर गावागावातून जात असल्याने गाव, तांडे, वाड्या, वस्त्या ओस पडल्या आहे. तर अनेकांनी आपल्या मुलाबाळांना सोबत नेल्याचे शाळांची पटसंख्याही घसरली आहे.महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात ऊस तोडणीचा हंगाम आला की, हजारो मजूर कारखान्याकडे धाव घेतात. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी भागात ऊस तोडणीसाठी जातात. महागाव तालुक्यातील धानमुख, दगडथर, कोठारी, बेलदरी, नांदगव्हाण, आमणी, बोथा, लोहरा, मुडाणा, वडद, धारेगाव, धारमोहा, चिल्ली, पिंपरी, आमणी, भांब, टेंभी, काळी, राहूर, शिऊर, फुलसावंगी, भोजूनाईक तांडा, कासारबेहळ, वरोडी, अनंतवाडी, काऊरवाडी, बारभाई तांडा, ईजनी, पोहंडूळ, तिवरंग, भोसा, दहीसावळी, मलकापूर, चिखली, वाकान, कोनदरी, पोखरी, पेढी, नागरवाडी येथील मजूर ऊस तोडणीसाठी गेले आहेत. तसेच पुसद तालुक्यातील माळपठार भागातील आणि उमरखेडच्या बंदी भागातील शेकडो मजूर कारखान्यावर कामासाठी जात आहे.मोठ्या प्रमाणात मजुरांची स्थलांतरण होत असताना प्रशासनाकडे मात्र कोणतीही नोंद दिसत नाही. गावखेड्यातील अनेक घरांना चक्क कुलूप लागले असून काही गावात तर केवळ वृद्ध मंडळीच दिसून येतात. परिणामी शाळांमधील पटसंख्याही रोडावली आहे. ऊस तोड मजुरांच्या पाल्यांसाठी वसतिगृहाची योजना तीन वर्षापूर्वी अमलात आणली होती. परंतु ही योजना भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याने बंद पडली. गावात मुलगा दुसऱ्याच्या भरोश्यावर ठेवण्यापेक्षा मजुरांनी आपल्या शाळकरी मुलांनाही सोबत नेले आहे. तसेच लहान मुलांना सांभाळण्यासाठी मोठी मुले कामी येत असल्याने त्यांनाही पालक आपल्यासोबत घेऊन गेले आहे. परिणामी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
दहा हजार मजुरांचे स्थलांतरण
By admin | Updated: November 12, 2016 01:48 IST