लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिल्लीतील सर्जनला दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या संदेश मानकरने पोलिसांना दिलेल्या बयाणातून मोठा गौप्यस्फोट होणार आहे. सोशल मीडियावर मॉडल म्हणून अनन्यासिंग ओबेरॉय या नावाने संदेश वावरत होता. त्याने अनेक हायप्रोफाइल व्यक्तींना आपल्या नादाला लावले होते. यातून त्याने अनेकांची फसवणूक केली. ती नावे त्याने पोलिसांपुढे सांगितली आहेत. आता याचा शोध पोलीस घेत आहेत. न्यायालयाने संदेश अनिल मानकर याला हनी ट्रॅप प्रकरणात ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्यामुळे मंगळवारी तपास अधिकारी एसडीपीओ माधुरी बावीस्कर यांनी संदेशला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी आणखी सात दिवसांच्या कोठडीची मागणी न्यायालयात केली. संदेशने पोलिसांना बयाणामध्ये कुणाकुणाला फसविले याची माहिती दिली. त्याचाही तपास करणे आवश्यक असल्याचे कारण पुढे करून वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने पाच दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली. पोलीस पथक आता संदेशने बयाणात दिलेल्या नावांचा शोध घेणार आहे. फसवणूक होऊनही त्या व्यक्तींनी तक्रार का दिली नाही याचीही पडताळणी केली जाणार आहे. त्याशिवाय संदेशने नागपूर शहरातून काही दागिन्यांची खरेदी केली होती. त्याचाही तपास केला जाणार आहे. पोलीस तपासात हनी ट्रॅपमध्ये होरपळलेल्या इतर जणांची नावे उघड करण्याचा प्रयत्न होणार आहे. जेणे करून त्यांची झालेली फसगत व ती रक्कम संदेशने कुठे खर्च केली, याचाही शोध घेतला जाणार आहे. थंड डोक्याने टाकतोय जाळे- संदेश मानकर हा मॉडेलच्या नावाने सोशल मीडियाचे अकाउंट चालवून हायप्रोफाइल व्यक्तींना गंडा घालत होता. हा गुन्हा करण्यासाठी तो अतिशय थंड डोक्याने व्यूहरचना आखत होता. संयम दाखवत पुढच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करूनच आपले उद्दिष्ट साध्य करीत होता. त्याच्या या हनी ट्रॅप प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे, यावरही पोलीस भर देत आहे. अजूनही एकट्या संदेशनेच हे नेटवर्क उभे केले नसावे, असा अंदाज आहे. त्याची खातरजमा झाल्यानंतरच पोलीस तपासाची दिशा ठरणार आहे.
हनी ट्रॅपमधील संदेशने बयाणात घेतली अनेकांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST