यवतमाळ : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या १८४ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अपात्र घोषित करण्यात आले आहेत. तसेच यवतमाळ नगरपरिषदेतील काँग्रेस नगरसेविका अंजुम परविन सैय्यद साजीद यांचे सदस्यत्व रद्द होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या अनेक उमेदवारांनी खर्चाचा हिशेब सादर केला नाही. यासाठी एक महिन्याचा अवधी या देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून या उमेदवारांना व ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ ब नुसार कारवाई करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक लढविणारे एक हजार ७७ उमेदवार पाच वर्षासाठी निवडणूक लढण्यास अपात्र ठरणार आहेत. यामध्ये १८४ ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. निवडणूक विभागाने अद्याप यवतमाळ, बाभुळगाव, घाटंजी, केळापूर, झरी येथील प्रक्रियेला सुरूवात केली नाही. त्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यवतमाळ नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक सात मध्ये समाविष्ट झालेल्या भागासाठी निवडणूक घेण्यात आली. यातील नगरसेवकासह तीन उमेदवारांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्यावरही अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये काँग्रेस नगरसेवक अंजुम परविन सैय्यद साजीद, भजपाचा उमेदवार कैलास ढोके, आरिफाबानो करिम खान यांना पाच वर्षासाठी निवडणूक बंदी करण्यात येणार आहे. शिवाय अंजुम परविन यांचे नगरपरिषद सदस्यत्वही रद्द केले जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
१८४ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
By admin | Updated: August 7, 2015 02:16 IST