अखेरची बैठक : आरोप-प्रत्यारोप, अधिकाऱ्यांचाही सुटला तोल यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची शुक्रवारी झालेली शेवटची सभा वादळी ठरली. आरोप-प्रत्यारोपांच्या या सभेत काही अधिकाऱ्यांचाही तोल सुटला. मात्र त्यांनी लगेच सावरत बाजू ठीकठाक करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समितीची अखेरची सभा पार पडली. सभेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दौरे, त्यांनी घेतलेला प्रवास भत्ता व मुक्कामावरून प्रश्न उपस्थित झाला. शासन निर्णयाप्रमाणे अधिकाऱ्यांना दौरे व मुक्काम ठरवून दिले असताना त्यांनी जिल्ह्यात कुठेच मुक्काम केले नाही. मात्र भत्ते उचलले, असा आरोप झाला. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १९८२ ची स्थिती व आजची स्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर संबंधित सदस्याने प्रोसीडींगवर अधिकाऱ्यांना मुक्कामाची गरज नाही, असे लिहिण्याचा आग्रह धरला. त्यावरून सदस्य व अधिकाऱ्यांत खडाजंगी उडाली. संतापाच्या भरात ‘त्या’ अधिकाऱ्यांनी दौरे न करताच भत्ते उचलले असेल, तर रक्कम परत करण्याची ग्वाही दिली. मात्र लगेच आपला संयम ढळल्याचे लक्षात येताच बाजू सावरून ‘सन्माननीय’ सदस्य म्हणत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलाला कॉपी पुरविण्याच्या प्रकरणाचा मुद्दाही उपस्थित झाला. चौकशीचे काय झाले, अशी पृच्छा सदस्याने केली. मात्र याबाबत चौकशी समिती नेमली होती, ही बाबच सीईओंना माहिती नव्हती, हेसुद्धा सभेत उघड झाले. तसेच लॅपटॉप खरेदी विना परवानगीने करण्यात आल्याने देयक अदा केले जाणार नाही, अशी ग्वाही सीईओंनी दिली. याप्रकरणी चौकशी करण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा वादळी
By admin | Updated: December 31, 2016 01:10 IST