कळंब : येथील ग्रामीण रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्च करून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. अजुनही निवासस्थान हस्तांतरित करण्यात आलेले नाही. परिणामी हस्तांतरणापुर्वीच बांधकामाचे नुकसान सुरु झाले आहे. याला जबाबदार कोण हा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.मुळात येथील वैद्यकीय कर्मचारी मुख्यालयी राहतच नाहीत. त्यामुळे रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागत होता. तर दुसरीकडे निवासस्थानांची व्यवस्थाच नसल्यामुळे राहायचे कुठे, हा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे होता. त्यामुळे निवासस्थानांचे बांधकाम करण्यात यावे, अशी येथील नागरिकांची मागणी होती. त्यामुळे शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करुन निवासस्थानचे बांधकाम करण्यात आले. परंतु अजुनही ते हस्तांतरित करण्यात आले नाही. त्यामुळे आजही अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे रुग्णांना मात्र याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्यावर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे. येथील बांधकाम पूर्ण झाले असून केवळ पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे हस्तांतरण थांबल्याची माहिती आहे. याला आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला. तरीही यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. यासंदर्भात वैद्यकीय अधिक्षक अंजली दाभेरे यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या, बांधकाम पूर्ण झाल्याची कुठलीही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालय प्रशासनाला दिलेली नाही. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे हस्तांतरण थांबल्याची माहिती आहे. शासकीय मालमत्तेचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी निवासस्थानाचे तात्काळ हस्तांतरण करणे गरजेचे आहे. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता भारशंकर यांच्याशी याबाबत संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)
वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने धूळ खात
By admin | Updated: October 16, 2014 23:31 IST