यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाचा गाडा पुरता पोखरला असून याला रुग्णालय प्रशासनाच्या चौकडीची वळवी कारणीभूत आहे. सोयीच्या जागेवर पोस्टींग मिळवून साहित्य खरेदीलाही सुरुंग लावण्यात आला आहे. रुग्णालयात प्रशासनाकडून आकस्मातरित्या साहित्य खरेदी केली जाते. एका दिवशी मर्यादित रकमेत खरेदीचा अधिकार असला तरी महिन्याकाठी हा आकडा लाखोंच्या घरातजातो. किरकोळ भंडारात तर कॅलक्युलेटर, पेपर, कार्बन, फाईल, बॅटरी पेन, सेल, वाशिंग पावडर, साबना, रजिस्टर, प्लास्टिक बॅग या शिवाय स्वच्छतेसाठी लागणाऱ्या प्लास्टिक कचराकुंड्या, डांबरी गोळ्या, फिनाईल याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. यासाठी वार्षिक ५० लाखाचे बजेट असते. या प्रमाणेच सर्जीकलसाठीसुद्धा स्थानिक पातळीवर किरकोळ साहित्याची खरेदी केली जाते. २००९ ते २०१० या कालावधीत झालेल्या खरेदीत जवळपास एक कोटी रुपयांची अनियमितता आहे. विशेष म्हणजे हा सर्व कारभार रुग्णालय प्रशासन विभागातील एका चौकडीकडून केला जातो. अधिष्ठाता कुणीही असला तरी त्याची मर्जी सांभाळून पद्धतशिरपणे बिले मंजूर करून घेतली जातात. किरकोळ भंडारात जाण्यासाठी किचन, मेडिकल बोर्ड असा प्रवास करत स्थान मिळविले. या सर्व पोस्टींग आऊट सोर्सिंगसाठी मोक्याच्या मानल्या जातात. याच पद्धतीने चौकडीकडून सर्व महत्त्वाच्या जागा ताब्यात घेवून मोठ्या प्रमाणात कॅश गोळा केली जाते. खरेदीवर दाखविलेल्या अनेक वस्तू प्रत्यक्षात घेतल्याच जात नाही. केवळ बिलांचा भरणा करून फाईल मेंटेन केली जाते. यामध्ये एका विभाग प्रमुखाचीही महत्त्वाची भूमिका आहे. जवळपास ७० लाखांच्या खरेदीला शेंडी लावण्याचा प्रयत्न झाला आहे. याच प्रमाणे स्वच्छतेसाठीसुद्धा लागणाऱ्या साहित्य खरेदीत हाच कित्ता गिरविण्यात येतो. किरकोळ साहित्य खरेदीत निचता गाठली असून पारध आपले सावज टिपण्यासाठी पाळत ठेवून असतो. हा सर्व उपक्रम चौकडीच्या माध्यमातून केला जातो. रुग्णालय प्रशासनाची घडी बसविण्यासाठी या चौकडीला बाहेर काढणे गरजेचे आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
मेडिकल प्रशासनाला चौकडीची वाळवी
By admin | Updated: April 27, 2015 01:54 IST