दोन सदस्य : पदव्युत्तर जागांसाठी पाहणी यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेडीसीन व सर्जरी विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता देण्यासाठी एमसीआयच्या (भारतीय आयुर्विज्ञान परिषद) चमूकडून पाहणी करण्यात आली. यानंतर २०१७-०१८ च्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल १२ विषयांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. प्रत्येकवर्षी त्याला एमसीआयकडून मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार जागा निश्चित केल्या जातात. गुरूवारी सकाळी एमसीआयच्या पथकातील दोन अधिकाऱ्यांनी मेडीसीन व सर्जरी विभागाची सखोल पाहणी केली. अभ्यासक्रमाच्या निकषानुसार सोयी सुविधा उपलब्ध आहेत काय, याचा अहवाल आता तयार केला जाणार आहे. याच अहवालावरून एमसीआय अभ्यासक्रमाची मान्यता कायम ठेवायची, जागा वाढवून द्यायच्या किंवा नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे मागील काही आठवड्यापासून रुग्णालय प्रशासन तणावात होते. गुरूवारी सकाळी ९ वाजतापासूनच तपासणी सुरू झाली. प्रथम क्लिनिकल, नंतर वॉर्ड, शस्त्रक्रियागृह, ग्रंथालय यासह अनेक महत्वाचे घटक पथकाने तपासले. त्यांनी दर्शविलेल्या उणिवांची पूर्तता करण्याची हमी महाविद्यालयतर्फे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला द्यावी लागते. त्यानंतरच मान्यता दिली जाते. ग्रामीण व दुर्गम भागातील रूग्णांसाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम असणे अत्यावश्यक आहे. याचा थेट परिणाम रूग्णसेवेवर होतो. त्यामुळे अभ्याक्रमाची मान्यता कायम ठेवून जागा वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
‘एमसीआय’कडून ‘मेडिकल’ची तपासणी
By admin | Updated: March 17, 2017 02:41 IST