यवतमाळ : बिन बुलाये मेहमान... ही म्हण इतरवेळी इतरांना चिडवण्यासाठी हक्काची. पण शनिवारी सायंकाळी यवतमाळातील प्रत्येक संवेदनशील माणूस हीच पदावली बिरूद म्हणून स्वत:हून मिरवत होता. सोहळाच तसा होता. अनाथ लाजवंती आणि नव्या विचाराचा श्रीराम या उभयतांचा सामाजिक विवाह सोहळा यवतमाळला नवी दिशा देणारा ठरला. या सोहळ्यातील हजारो माणसांची गर्दी म्हणजेच एक कुटुंब बनले होते. जात-पात, धर्म विसरून प्रत्येक जण भारतीय बनला होता. गर्दीतला प्रत्येक जण वऱ्हाडीही होता अन् वधू-वरांचा पालकही!शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या लाजवंती आणि दिग्रस येथील श्रीराम सरमोकदम यांचा हा विवाह. वझ्झर (जि. अमरावती) येथील बालगृहात लहानाची मोठी झालेली लाजवंती दिग्रसची सून झाली. यवतमाळातील नंदूरकर महाविद्यालयाच्या पटांगणात सायंकाळी हजारोंच्या हजेरीत लाजवंती-श्रीरामवर आशीर्वादाच्या अक्षता उधळल्या. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता याच ठिकाणी वैदिक पद्धतीने विवाहविधी पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी शीतल राठोड यांनी लाजवंतीचे कन्यादान केले. सकाळी झालेल्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पालकमंत्री लाजवंतीचे पालक या नात्याने स्वत: दारात उभे राहून डोक्यावर फेटा बांधून पाहुण्यांचे स्वागत करीत होते. तर सभागृहात बसलेल्या पाहुणे मंडळींची वास्तपूस्त करण्यासाठी खास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह जातीने लक्ष घालत होते. श्रीमंता घरी लक्ष्मी पाणी भरते म्हणतात. पण प्रामाणिक माणसांच्या दारात विद्वता वास करते, हे या सोहळ्यात पदोपदी जाणवत राहिले. शंकरबाबांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे हा विवाह ‘सामाजिक’ बनला. अन् त्यांच्याच प्रांजळ प्रयत्नांना मनोमन सलाम करत पालकमंत्री, खासदार, विविध आमदार, जिल्हाधिकारी, एसपी असे अधिकारी स्वत: पाहुण्यांची सरबराई करीत होते. सायंकाळी ६ वाजतापासून नंदूरकर महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो सद्गृहस्थांनी धाव घेतली. अनेक जणांना औपचारिक निमंत्रणही नव्हते. पण सारेच आले. आपण एका क्रांतिकारी क्षणाचे साक्षीदार होत आहोत, याच भावनेने वऱ्हाडी जमले. आशीर्वादांनी ओतप्रोत भरलेल्या गर्दीतच अनाथ लाजवंतीचा उल्लेख ‘चिंसौकां’ असा झाला अन् तिच्या चर्येवरचे भावही नव्या नवरीला साजेसेच खुलून गेले. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष सुभाष राय, ‘लोकमत’चे जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, डॉ. प्रकाश नंदूरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, एसपी अखिलेखकुमार सिंग यांनी लाजवंतीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
लाजवंतीच्या विवाहात प्रत्येक जण वऱ्हाडी अन् पालक
By admin | Updated: December 13, 2015 02:26 IST