शिक्षकाचा समावेश : रस्ता रूंदीकरणाने घेतला बळीमारेगाव : वणी-करंजी रस्ता रूंदीकरणाच्या असुरक्षित कामाचे आणखी दोन बळी ठरले. तालुक्यातील सराटी येथील शिक्षक व त्यांच्या पत्नीला या कामामुळे आपला जीव गमवावा लागला. ही घटना सोमवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली.गजानन विठ्ठल मत्ते (४२) व त्यांची पत्नी वैशाली (३५), अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी मत्ते हे पत्नी वैशालीसह दुचाकीने (एम.एच.२९-ए.पी.९४0४) चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे एका लग्नाला गेले होते. तेथून सायंकाळी गावाकडे परत येत असताना येथील कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयाजवळ अपघात झाला. रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने एक मार्ग बंद करण्यासाठी रस्त्यावर ठेवून असलेल्या लोखंडी फलकाला दुचाकी धडकल्याने दोघेही डिव्हायडरच्या भिंतीवर आदळले. दोघांच्याही डोक्याला जबर मार बसला. गजानन यांचे दोन्हीही पाय अनेक ठिकाणी तुटले. पोलिसांनी दोन्हीही जखमींना प्रथम येथील ग्रामीण रूग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रवाना केले. मात्र गजानन यांचा मारेगाव-वणी प्रवासादरम्यान वाटेतच मृत्यू झाला. तर वणी येथील रूग्णालयात त्यांची पत्नी वैशाली यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे सराटीवर शोककळा पसरली आहे.चौपदरी मार्ग ठरतोय यमदूतआत्तापर्यंत वणी-करंजी रस्ता रूंदीकरणाच्या असुरक्षित कामामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सोमवारीही एका बाजूचे डांबरीकरणाचे काम सुरू असताना लोखंडी बोर्ड व दगड लावून दुसऱ्या बाजूचा मार्ग बंद करण्यात आला होता. तेथे रिफ्लेक्टर लावले नव्हते. परिणामी समोरून आलेल्या वाहनाच्या लाईटने मत्ते दाम्पत्य दिपले असावे. त्यामुळे रस्ता बंद असल्याचे त्यांना कळलेच नाही आणि अपघात घडला असावा, असा कयास पोलिसांनी वर्तविला आहे. (शहर प्रतिनिधी)दोन मुलांचे छत्र हरविले गजानन मत्ते यांना दोन मुले आहेत. त्यापैकी मोठा मुलगा नागपूर येथे बी.ई. करीत आहे. दुसरा लहान मुलगा गावातच दहावीत शिकत आहे. आई-वडिलाच्या अपघाती मृत्यूने या भावंडांच्या डोक्यावरील छत्र हरविले आहे. गजानन मत्ते यांनी प्रथम सराटीनजीकच एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभी पोड येथे वस्तीशाळा शिक्षक म्हणून कार्य केले. वस्तीशाळा बंद झाल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेने आपल्या सेवेत सामावून घेतले. कुंभी पोड येथे आता वस्तीशाळेऐवजी पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. गेल्या चार वर्षांपासून गजानन तेथेच सहायक शिक्षक म्हणून कार्य करीत होते. पूर्णवेळ शिक्षक म्हणून त्यांची केवळ चारच वर्षांची सेवा झाली आहे. अपघातात त्यांचा बळी गेल्याने कुंभी पोडातील कोलाम बांधवांनीही हळहळ व्यक्त केली.
मारेगावात दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार
By admin | Updated: April 27, 2016 02:34 IST