मारेगाव : वातावरणात अचानक झालेला बदल, प्रशासनाचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे तालुक्यात तापाच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यातील ग्रामस्थांना ताप, सर्दी, खोकल्यामुळे हैराण करुन सोडले आहे.तालुक्यासाठी तापाची साथ नवीन गोष्ट नाही़ वारंवार साथ सुरूच असते. त्यामुळे तालुक्यात आरोग्य विभाग नावापुरताच उरला आहे. शासनाच्या योजना कागदोपत्री राबविणे, एवढ्यासाठीच हा विभाग तालुक्यात कार्यरत असल्याचे दिसत आहे. या विभागाचे जवळपास सर्वच कर्मचारी बाहेर गावावरून अप-डाऊन करतात़ त्यामुळे कुणाचेच कुणावर नियंत्रण नसल्याने सर्वांची मनमानीच सुरू आहे़ आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे काम ठप्प असल्याने आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने वातावरणात थोडा जरी बदला झाला, तरी तालुक्यात तापाची साथ डोके वर काढते़ गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाला़ एक दिवस थंडी पडली, त्यापूर्वी कडक ऊन्ह तापले. गेल्या चार दिवसांपासून सूर्याचे दर्शन दुरापास्त होऊन अधूनमधून पाऊसही पडत आहे. त्यामुळे वातावरण दमट झाल्याने डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे़ या विपरीत वातावरणाचा परिणाम ग्रामीण जनतेच्या आरोग्यावर होत आहे़ ग्रामस्थांना थंडी वाजून ताप येणे, सर्दी, खोकला, अंग दुखणे आदी आजाराने ग्रासले आहे. मात्र शासकीय आरोग्य सेवेचा पुरेसा लाभ जनतेला मिळत नाही. परिणामी खिशात पैसा नसतानाही ग्रामस्थांना खासगी डॉक्टरांकडे धाव घेऊन उपचार करवून घ्यावे लागत आहे़ खासगी डॉक्टरही संधीचा पुरेपुर लाभ घेताना दिसत आहे़ बरेचदा रूग्णांना सलाईनची आवश्यकता नसतानाही खासगी डॉक्टर रूग्णांना सलाईन लावून आपला आर्थिक लाभ करून घेत आहे़ ग्रामीण भागात औषधी दुकाने नसल्याने डॉक्टरच तपासणीसोबतच औषधी विकण्याचा गोरखधंदा करीत असल्याचे चित्र दिसत आहे. औषधे जादा प्रमाणात खपविण्याच्या नादात रूग्णांना वारेमाप औषधे दिले जात आहे़ त्यामुळे रूग्णांना नाहक आर्थिक झळ सोसावी लागत आहे़शासकीय आरोग्य सेवा ग्रामीण भागात पोहोचत नसल्याने बोगस डॉक्टरांनी या संधीचा लाभ उठविणे सुरू केले आहे़ मारेगाव तालुक्यात खुलेआम बोगस डॉक्टरांची प्रॅक्टीस सुरू आहे़ त्यांना कुणाचाच धाक नसल्याने बोगस डॉक्टर खुलेआम जनतेची आर्थिक लूट करीत आहे़ त्यांचे उपचारही अघोरी असतात़ त्यामुळे काही रुग्णांवर अपंगत्वाची वेळ ओढवली आहे़ मात्र उपाय नसल्याने ग्रामस्थांना त्यांच्याकडून उपचार करवून घ्यावे लागत आहे़ अनेकांच्या आरोग्यात काळोख निर्माण करणाऱ्या या डॉक्टरांवर आरोग्य विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ (शहर प्रतिनिधी)
मारेगावात पुन्हा तापाची साथ
By admin | Updated: October 27, 2014 22:45 IST