तयारीची बैठक : हजारोंच्या उपस्थितीचे नियोजन यवतमाळ : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ यवतमाळातही मराठा-कुणबी समाजाच्यावतीने मूक क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात मंगळवारी येथील संदीप मंगलम्मध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला समाजातील सर्वच क्षेत्रातील सुमारे चार हजारांवर समाज बांधव उपस्थित होते. मराठा-कुणबी समाज हा कधीच एकत्र येऊ शकत नाही, अशी नकारात्मकेतची भावना जाणीवपूर्वक समाजात रुजविण्यात आली. मात्र कोपर्डीच्या घटनेने समाजमन हादरले असून समाजाच्या समस्यासाठी सर्वांनी एकत्रीतपणे लढणे आवश्यक असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच कोणत्याही नेतृत्वाशिवाय संपूर्ण राज्यभर मराठा-कुणबी समाजाचे लाखोंच्या संख्येत मोर्चे निघत असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. आता यवतमाळातही २५ सप्टेंबरला दुपारी १ वाजता समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथून मूक क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील लाखो नागरिक सहभागी होणार आहे. त्या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बैठकीला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शासकीय, निमशासकीय अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. कुणबी-मराठा समाजाच्या मुलांसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृहाची व्यवस्था करावी, शेतीची कर्ज पूर्णत: माफ करून शेतमालाला योग्य भाव द्यावा, शासनातील ओबीसी संवर्गाची रिक्तपदे तातडीने भरण्यात यावी, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकर बांधून पूर्ण करावे, आदी मागण्या मोर्चेकरी करणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
मराठा-कुणबी समाजाचा २५ ला मूक क्रांती मोर्चा
By admin | Updated: September 14, 2016 01:14 IST