यवतमाळ : शहरातील संवेदनशील महिलांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. रविवारी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी या उपक्रमाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. चापमनवाडी परिसरातील शिंदे नगरात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘सबका मालिक एक’ असा संदेश देणाऱ्या साई मंदिराच्या दर्शनी भागातील भिंतीला उत्तम रंगविण्यात आले. माणुसकीचे झाड काढण्यात आले आहे. गरीब-श्रीमंत अशी सर्व पाखरे त्यावर बसलेली आहेत, असा सूचक देखावा रेखाटण्यात आला आहे. कपडे, वस्तू ठेवण्यासाठी लोखंडी रॅक आणि तारा लावण्यात आल्या. समाजातील श्रीमंतांनी किंवा मध्यमवर्गीयांनीही आपल्याकडील जुन्या (किंवा नव्या) वस्तू येथे आणून ठेवाव्या. गरिबांनी त्या वस्तू वापरण्यासाठी घेऊन जाव्या, असा हा उपक्रम आहे. पहिल्याच दिवशी या भिंतीवर परिसरातील नागरिकांनी विविध वस्तू आणि कपडे आणून ठेवले. तर गोरगरिबांनी त्या वस्तू नेल्या. रविवारी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी याच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना निमंत्रित करून उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठांनी दीप प्रज्वलित केले, तर तरुणांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. हा उपक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मोहिनी सचिन त्रिवेदी, दीपाली अग्रवाल, माधुरी पुराणिक, आरती बुरडकर, मालती पटेल, अश्रफ गिलाणी, कविता भोसले, पूजा रायचुरा आदी महिला यावेळी उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)
ज्येष्ठांनी उभारली ‘माणुसकीची भिंत’
By admin | Updated: January 5, 2017 00:15 IST