यवतमाळ : येथील धामणगाव रोड ते देवगाव रोड या १० कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामातील अडसर दूर झाला असून आठवडाभरात या कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता सी.व्ही. तुंगे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय रस्ते विकास निधीमधून यवतमाळच्या धामणगाव रोड ते देवगाव या मार्गाचा विकास केला जात आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी खेचून आणला होता. मात्र त्याच दरम्यान एका कंत्राटदाराने आपल्या प्रलंबित देयकाचा मुद्दा उपस्थित करीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यामुळे गेली दोन वर्ष हे काम थंडबस्त्यात पडले होते. न्यायालयाने थकीत देयक वेगळे आणि विकासाची प्रक्रिया वेगळी असा निकाल देऊन याचिका निकाली काढल्याने धामणगाव रोडच्या या दहा कोटींच्या रस्ता बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. या रस्त्याच्या निविदा काढण्याच्या सूचना यवतमाळच्या संबंधित अभियंत्यांना देण्यात आल्या असून दोन आठवड्यात निविदा काढल्या जातील, असे मुख्य अभियंता सी.व्ही. तुंगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी) १५ कोटींच्या देयके मंजुरीत सापत्नता ४यवतमाळ जिल्ह्यातील कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. ती मिळावी म्हणून सर्वच कंत्राटदारांची धडपड आहे. मात्र देयकांसाठीचा निधी प्राप्त होताच त्याच्या वाटपात मर्जी राखण्याचे प्रकार सार्वजनिक बांधकाम खात्यात सुरू आहे. ‘नॉन प्लॅन’मधील प्राप्त निधीतून देयके वाटताना पुसदमध्ये हा प्रकार पुढे आला. कंत्राटदारांनी त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. या योजनेतून १५ कोटी रुपये जिल्ह्याला मिळाले आहे. पुसद, पांढरकवडा, यवतमाळ व विशेष प्रकल्प या चार विभागात हा निधी वाटप केला जात आहे. मात्र या निधीतून देयके मंजूर करताना कागदपत्रांच्या तपासणीच्या आड मर्जीतील कंत्राटदारांना अधिक निधी दिला जात असल्याची ओरड पुसदचे कार्यकारी अभियंता खुशालराव पाडेवार यांच्याबाबत केली जात आहे. त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणीही कंत्राटदारांमधून पुढे आली आहे.
१० कोटींच्या रस्ता बांधकामाचा मार्ग सुकर
By admin | Updated: September 2, 2015 03:56 IST