पुसद : मागील २० वर्षांच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच सरासरीपेक्षा अत्यल्प प्रमाणात पुसद तालुक्यात पाऊस झाला आहे. पावसाळा सुरू होवून दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही आतापर्यंत तालुक्यात केवळ १६२ मि.मी. एवढाच पाऊस झाला. अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील लहान-मोठ्या ६० तलावांपैकी तब्बल ५० तलाव पूर्णत: कोरडे पडले असून उर्वरित तलावात केवळ चार ते सहा टक्के एवढाच जलसाठा उपलब्ध आहे. पूस धरणात १६ टक्के पाणी आहे. पावसाच्या लहरीपणामुळे पुसद तालुक्यातीलच नव्हे जिल्ह्यातील खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. पुसद तालुक्यात मागील २० वर्षांचा आढावा घेतला असता १९९५ मध्ये ९५१ मि.मी., १९९६ मध्ये एक हजार तीन, १९९७ मध्ये ८९३, १९९८ मध्ये एक हजार १७९ मि.मी., १९९९ मध्ये १२०५.९० मि.मी., २००० मध्ये ६२८.२०, २००१ मध्ये १०३२.८०, २००२ मध्ये १३२५.१०, २००३ मध्ये ७३४.८०, २००४ मध्ये ४४७.७४, २००५ मध्ये १०६६.७०, २००६ मध्ये १०६५.६०, २००७ मध्ये ६६९.५०, २००८ मध्ये ८२८.९२, २००९ मध्ये ५५८, २०१० मध्ये १३२०, २०११ मध्ये ८३४, २०१२ मध्ये ९५१ आणि २०१३ मध्ये ८५० मि.मी. एवढा पाऊस झाला होता. यावर्षी १३ आॅगस्टपर्यंत १६२ मि.मी. एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. २०११ पासून सातत्याने पावसाचे प्रमाण कमी होत आहे. या तीन वर्षातील सरासरी पाऊस हा एक हजार मि.मी. एवढा झालेला नाही. पुसद तालुक्यात कोल्हापुरी बंधारे, गाव तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव असे एकूण ६० लहान-मोठे तलाव आहेत. यापैकी ५० पेक्षा जास्त तलाव कोरडे पडले असून काही तलावात चार ते सहा एवढाच अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. वरुण राजाची यापुढेही अशीच वक्रदृष्टी राहिल्यास उर्वरित तलावसुद्धा कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. (तालुका प्रतिनिधी)
२० वर्षांत प्रथमच सर्वात कमी पाऊस
By admin | Updated: August 14, 2014 00:06 IST