नागरिकांत रोष : डायरियाच्या रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळहिवरी : आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव शनिवारी भांब येथील नागरिकांना आला. डायरियाची लागण झालेल्या रुग्णांना या गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचार मिळू शकले नाही. परिणामी गंभीर अवस्थेतील १० रुग्ण यवतमाळ येथे हलविण्यात आले. अन्न पदार्थातून काही जणांना डायरियाची लागण झाली. यामध्ये वैष्णवी विलास काळे (५), रागिणी दिलीप देवरे (५), मारोती काळे (५०), यल्ला काळे (४५) आदींचा समावेश आहे. उपचारार्थ त्यांना सुरूवातीला भांब येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते. केवळ परिचारिकांची उपस्थिती होती. त्यांनी रुग्णांवर उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या रुग्णांना हिवरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. याठिकाणीही भांब उपकेंद्राचाच अनुभव नागरिकांना आला. वैद्यकीय अधिकारी नसल्याने सर्व रुग्ण यवतमाळ येथे हलविण्यात आले. भांब आणि हिवरी येथील आरोग्य केंद्राच्या कारभाराविषयी उपसरपंच सुनील डिवरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड यांच्याशी संपर्क केला. यावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सदर आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून आपला राग व्यक्त केला. या परिसरातील नागरिकांना नेहमीच चांगल्या आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागते. गंभीर रुग्णांवर कधीही उपचार केले जात नाही. यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला दिला जातो. या प्रकाराविषयी वरिष्ठ पातळीवरील अधिकारीही गंभीर नसल्याचे दिसून येते. सदर प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. (वार्ताहर)
भांब आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले
By admin | Updated: July 3, 2016 02:30 IST