पशुधनपालकांमध्ये नाराजी : वेळीच उपचाराअभावी दगावतात जनावरेपारवा : जनावरांना विविध प्रकारचा आजार होत असल्याने पशुधनपालक चिंतेत आहे. मात्र दुसरीकडे चिखलवर्धा आणि एरंडगाव येथील पशुचिकित्सालयांना कुलूप राहात आहे. या विभागाचे वरिष्ठही या संदर्भात गंभीर नाहीत. त्यामुळे पशुधनपालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील पशुचिकित्सालय बहुतांशवेळा बंद असते. उपचारासाठी जनावरे घेऊन येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागते. याठिकाणी पशुचिकित्सक आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांपूर्वी सुसज्ज निवासस्थाने बांधली आहेत. याचा उपयोग कार्यरत कर्मचाऱ्यांकडून घेतला जात नाही. या इमारतींची दुरावस्था होत चालली आहे. चिखलवर्धा पशुचिकित्सालयाला परिसरातील सात ते आठ गावे जोडण्यात आलेली आहे. उपचारासाठी जनावरांना घेऊन येणाऱ्या नागरिकांना पशुचिकित्सक आणि कर्मचारी कधीच उपलब्ध होत नाही. एखाद्यावेळी आढळले तरी योग्य उपचार केला जात नाही. चिखलवर्धा, गोविंदपूर, ताडसावळी, कुर्ली आदी गावे या पशुचिकित्सालयाला जोडली गेली आहे. या गावांमध्ये पशुधन मोठ्या प्रमाणात आहे.अशीच काहीशी अवस्था एरंडगाव येथील पशुचिकित्सालयाची आहे. या चिकित्सालयाला परिसरातील पाच ते सहा गावे जोडण्यात आलेली आहे. यामध्ये कोपरी, चिंचोली, इंझाळा, किन्ही आदी गावांचा समावेश आहे. याठिकाणी नियुक्त पशुचिकित्सक आणि कर्मचारी अपवादानेच उपलब्ध होतात. या पशुचिकित्सालयांच्या कारभाराविषयी संबंधितांना विचारल्यास थातुरमातूर उत्तर दिले जाते. वरिष्ठही दुर्लक्ष करत असल्याने त्यांचे चांगलेच फावत आहे. यात मात्र पशुधनपालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. (वार्ताहर)
चिखलवर्धा व एरंडगावचे पशुचिकित्सालय कुलूपबंद
By admin | Updated: October 19, 2016 00:22 IST