सीपीएसएमएस प्रणाली : रोहयोच्या कुशल कामांचा निधी यवतमाळ : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायतींना विविध योजनांचा थेट निधी दिला जातो. बऱ्याचदा कोट्यवधीच्या घरातील रकमांमध्ये अफरातफर होत असल्याची प्रकरणे बाहेर आली. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत थेट बँक खात्यावरच वॉच ठेवला जात आहे. सीपीएसएमएस (सेंट्रल प्लान स्किम मॅनेजमेंट सिस्टीम) या प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन लेखाजोखा पहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील ९०० ग्रामपंचायतींचे बँक खाते या पद्धतीने अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयात बसूनच ग्रामपंचायतीकडून मिळालेले खर्चाचे विवरण आणि त्यांच्या बँकखात्यात जमा असलेली रक्कम याची पडताळणी करता येते. रोजगार हमी योजनेतील अकुशल कामाची मजुरी कामगारांच्या खात्यात जमा केली जाते. मात्र कुशल कामाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात टाकण्यात येते. ही रक्कम मोठ्या प्रमाणात असते. त्यावरून ग्रामपंचायतीच्या खात्यातील शिल्लक रक्कम किती, खर्च किती, झालेले काम किती याची थेट पाहणी करता येते. विशेष म्हणजे नरेगा आयुक्तसुद्धा ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांची पडताळणी करू शकतात. कारभार अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच धर्तीवर ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडाच्या खर्च विवरणाची पडताळणी करता येते काय, यासाठी उपाययोजना सुरू आहे. सर्व ग्रामपंचायतींचे बँक खाते आॅनलाईन करून त्यांच्या ताळेबंदावर थेट नियंत्रण ठेवले जाणार आहे. रोहयोची सीपीएसएमएस पद्धत यशस्वी झाल्याने आता त्याचा इतरही योजनांसाठी उपयोग करण्याचे प्रस्तावित आहे. (कार्यालय प्रतिनिधी)गैरप्रकाराला आळा बसणार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांमध्ये नेहमी गैरप्रकाराची ओरड होत असते. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतरही कारवाई होत नाही. अनेकदा ग्रामसेवक हिशेबच सादर करीत नाही. हिशेब न सादर करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई झाल्यानंतरही कोणतीही सुधारणा झाली नाही. थेट व्यवहार बघता येणार असल्याने गैरप्रकाराला निश्चितच आळा बसेल.
ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांवर थेट वॉच
By admin | Updated: June 24, 2015 00:08 IST