यवतमाळ : सर्पदंश झाल्यावरही तो जिवंत आहे. उपचार घेऊन ठणठणीत झालेला हा विद्यार्थी दुसऱ्याच दिवशी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आपला प्रयोग घेऊन हजरही झाला. इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातील हा ‘जिवंत’ प्रयोग अनेकांना प्रेरक ठरला!कळंब तालुक्यातील नांझा येथील हेमंत बावणे या विद्यार्थ्याची ही हकीगत. प्र. मा. रुईकर ट्रस्टच्या नांझा येथील शाळेत तो दहाव्या वर्गात शिकतो. रविवारी शाळेच्या मैदानावर तो आणि त्याचे मित्र व्हॉलीबॉल खेळत होते. अचानक चेंडू झुडूपात गेला. तो आणण्यासाठी धावत गेलेल्या हेमंतच्या हातावर चक्क सापच आला. त्याच्या मनगटाला सापाने दंश केला होता. पण जिगरबाज हेमंतने दुसऱ्या हाताने साप बाजूला फेकला. अन् तडक नांझाच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. एवढी मुलं पाहून वैद्यकीय अधिकारी डॉ. कोटेचा यांनीही तातडीने दखल घेतली. जखम बांधली. इंजेक्शन दिले. पण हेमंत अजिबातही गडबडला नव्हता. घरी जाऊन त्याने वडिलांनाही माहिती दिली. घरच्यांना थोडी धाकधुक वाटली, पण मुलगा ठणठणीत असल्याने काळजीचे कारण वाटले नाही.दुसऱ्या दिवशी सोमवारी यवतमाळच्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात तो आपला प्रयोग घेऊन हजर झाला. सोबत केवळ ऋषिकेश ठाकरे या मित्राला घेऊन आला. त्याचे मार्गदर्शक चंद्रकांत वाळके यवतमाळात पोहोचले होते. ‘पवनचक्कीतून ऊर्जानिर्मिती’ हा प्रयोग हेमंतने साकारला आहे. मात्र, त्याच्या विज्ञान प्रयोगापेक्षाही तोच एक जिवंत प्रयोग ठरला आहे. इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात तो जिवंत इन्स्पिरेशनच. इतर शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा हेमंतची हकीगत कळली, तेव्हा सारेच नवल करीत होते. त्याच्या हातावरील सापाच्या चाव्याची जखम बघण्यात इतर मुलं मग्न झाली होती. (स्थानिक प्रतिनिधी) त्या सापाची मला माहिती होती. मी माझ्या हाताने त्याला बाजूला केले. बिनविषारी होता म्हणून मारण्याचे कारणच नव्हते. मला सुई टोचल्यासारखी वेदना झाली एवढेच. - हेमंत बावणे, विद्यार्थी, नांझा.
विज्ञान प्रदर्शनात ‘जिवंत’ प्रयोग!
By admin | Updated: September 1, 2015 03:04 IST