पांढरकवडा : शहरात ले-आऊटचा गोरखधंदा चांगलाच फोफावला असून अटींच्या पूर्ततेपूर्वीच प्लॉटची विक्री केली जात आहे़ यात अनेक ग्राहक बळी पडत असून त्यांची लूट होत आहे.शहराच्या चारही बाजूला मोठ्या प्रमाणावत शासनमान्य अधिकृत ले-आऊटचे फलक जागोजागी लागले आहे. किमान अटींची पूर्तता करण्यापूर्वीच अनेक ले-आऊटधारक सर्रास प्लॉटची विक्री करुन देत आहे. त्यामुळे भविष्यात ग्राहकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे़ काही ले-आऊट तर येथील नगरपरिषद आणि लगतच्या ग्रामपंचायत हद्दीतही येत नाहीत.शहराच्या सभोवताल जमिनीचे दर आकाशाला भिडले आहे. शहरात गेल्या अनेक वर्षात कोणताही औद्योगिक विकास झाला नसला, तरी सभोवताल मोठ्या प्रमाणात जमिनी अकृषक करुन प्लॉटची विक्री जोमात सुरु आहे़ काही ले-आऊटधारक सर्व नियम धाब्यावर बसवून प्लाटची सर्रास विक्री करुन देत आहे़ आकर्षक जाहिराती ग्राहकांना भुरळ घालत आहेत. नियमानुसार नवीन ले-आऊटमध्ये वीज, पाणी, रस्ते, नाल्या, सार्वजनिक मोकळी जागा व सोबतच परिसराचा इतर विकास केल्याशिवाय प्लॉट खरेदी-विक्रीला परवानगी मिळत नाही. मात्र शहराच्या सभोवताल पसरलेल्या अनेक ले-आऊटमध्ये यापैकी कोणतीही सुविधा दिसून येत नाही. तरीही प्लॉट विक्रीचा गोरखधंदा जोमात सुरू आहे.नागपूर, वर्धा, यवतमाळ, आर्वी, पुसद आदी ठिकाणच्या बिल्डरांनी येथील ले-आऊटच्या धंद्यावर कब्जा केला आहे. एकच प्लॉट दोन ते तीन ग्राहकांना विकण्याचे प्रकार घडत आहेत़ या प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवसायात अनेकदा वाद निर्माण होत आहे. त्यातून हाणामाऱ्यांचे प्रकार घडत आहेत़ ले-आऊटधारक मात्र साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर करून या गोरखधंद्यात उतरले आहेत़ कृषक जमीन विकत घेऊन ती अकृषक न करताच प्लॉट पाडून विक्री केली जात आहे़ अनेक ले-आऊटमध्ये रस्ते आहे तर वीज नाही, पाण्याची टाकी नाही, सांडपाणी वाहून जाण्याकरिता नाल्या तर कोणत्याच ले-आऊटमध्ये नाही़ प्लॉटची विक्री करून नोंदणी मात्र तातडीने करून देण्यात येते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकांच्या उशिरा लक्षात येत आहे़ शहरातील अनेक ले-आऊटधारक खरेदी खतात केवळ ‘विकासात्मक कामे पूर्ण’, असा शब्दप्रयोग करतात. नेमकी कोणती विकास कामे पूर्ण झाली, हे लिहिण्याचे मात्र हेतुपुरस्सर टाळतात. त्यामुळे भविष्यातील समस्यांबाबत आपण जबाबदार राहणार नाही, याची ले-आऊटधारक पध्दतशीरपणे काळजी घेत आहे़ (तालुका प्रतिनिधी)
पांढरकवड्यात ले-आऊटचा गोरखधंदा
By admin | Updated: July 27, 2014 23:59 IST