केळझरची घटना : यवतमाळ न्यायालयाचा निकाल यवतमाळ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जाळून मारणाऱ्या आर्णी तालुक्यातील केळझर येथील दारूड्या पतीला येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली आहे. यादव आत्माराम राठोड (४८) रा. केळझर ता. आर्णी असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. तो पत्नी चंदा यादव राठोड (४०) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमी मारहाण करायचा. १४ डिसेंबर २०११ रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी ४ वाजता चंदा स्वयंपाकगृहात काम करीत असताना पती यादव हा दारू पिऊन आला. तिच्या चारित्र्यावर संयश घेऊन वाद घालायला सुरूवात केली. या वादात त्याने दुसऱ्या खोलीतून पाच लिटर रॉकेलची डबकी आणून चंदाच्या अंगावर ओतली आणि आग लावून दिली. शेजाऱ्यांनी तिला यवतमाळ आणि नंतर सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले. ८७ टक्के जळालेल्या अवस्थेत मृत्यू झाला. या प्रकरणी चंदाचा भाऊ अनिल रामचंद जाधव रा. किन्ही याने दिलेल्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर चंदाचे मृत्यूपूर्व बयाण, शेजाऱ्यांची व डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरून गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी आरोपी यादव राठोड याला जन्मठेप व पाच हजार दंड ठोठाविला. सरकार पक्षातर्फे अॅड. शुभांगी दरणे यांनी काम पाहले. (प्रतिनिधी)
पत्नीला जाळून मारणाऱ्यास जन्मठेप
By admin | Updated: April 21, 2016 02:47 IST