नागरिक रस्त्यावर : भाजपाच्या राजेंद्र नजरधनेंना आंदोलनाला भेट द्यायलाही वेळ नाही संजय भगत महागावरस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मुलभूत सुविधांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या बंदीभागातील नागरिकांच्या समस्या आमदारांच्या लेखी नगण्य आहेत. सतत पाच दिवस मोरचंडीच्या जंगलात आंदोलन करूनही आमदाराला आंदोलनस्थळी जाण्यास वेळ मिळाला नाही. उलट परतवाड्याचे आमदार बच्च कडू येतात आणि समस्या मार्गी लावून जातात. त्यामुळे उमरखेडच्या आमदारांना येथील नागरिकांच्या समस्यांचे काही देणेघेणे नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. बंदी भागातील नागरिक कित्येक दशकांपासून समस्यांनी ग्रस्त आहेत. मूलभूत सुविधाही येथे मिळत नाही. दूषित पाणी प्राशनाने किडणीचे आजार होत आहेत. अनेकदा आंदोलने करूनही पदरी काहीच पडले नाही. परंतु येथील नागरिकांनी पाठपुरावा सोडला नाही. गत आठवड्यात मोरचंडीच्या जंगलात शेकडो नागरिकांनी आंदोलन सुरू केले. पाच दिवस उपोषण सुरू होते. परंतु या पाच दिवसाच्या काळात स्थानिक आमदार राजेंद्र नजरधने यांनी आंदोलनस्थळाला भेटही दिली नाही. त्यामुळे नागरिकांत चांगलाच रोष दिसत आहे. बंदीभागात किडणीच्या आजाराने किमान ४०० ते ५०० लोक प्रभावित झालेल आहेत. त्यातील अनेकांचा मृत्यू झाला आहे. टाकळीपासून थेट मोरचंडी, थेरडी, बोरगाव, डोंगरगाव, जवराळा, एकांबा, कुरळी, कोरटा, दराटी, मन्याळी ते खरबी नाक्यापर्यंत रस्ताच नाही. बंदीभागातील लोकांना आरोग्य सुविधा म्हणजे एक तर नांदेड नाही तर पुसद महागावलाच जावे लागते. आजपर्यंत सर्वच पक्षांनी येथील नागरिकांची उपेक्षा केली. गत निवडणुकीत भाजपाने विकासाचे स्वप्न दाखविले. अच्छ दिन येणार म्हणून बंदीभागातील नागरिकांनी कमळाला मदत केली. आमदार नजरधने निवडून आले परंतु त्यांनी निवडून आल्यानंतर या भागाच्या समस्या जाणून घेतल्या नाही. गत आठवड्यात झालेल्या आंदोलनाचीही त्यांनी दखल घेतली नाही. निवडणुकीत विजय मिळाला की, जनतेशी नाळ तुटते असाच अनुभव त्यांच्याहीबाबतीत येथील नागरिकांना आला. स्थानिक आमदार दखल घेत नाहीत परंतु अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार जंगल तुडवत मोरचंडीत येतात. प्रशासनाला जाब विचारतात. प्रशासन त्यांच्यापुढे नमते, नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन मिळते. जे आमदार बच्चू कडुंना जमले ते आमदार नजरधनेनां का जमु नये, असा प्रश्न बंदीभागातील नागरिक विचारत आहेत.
बंदीभागातील समस्यांकडे आमदारांची पाठ
By admin | Updated: January 17, 2017 01:25 IST