अर्थसंकल्पीय सभा : विकास निधीचा मुद्दा आर्णी : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेच्या सुरुवातीला सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकाने नगर परिषदेच्याच हॉलमध्ये स्वत:ला कोंडून घेतल्याने सोमवारी आर्णीत एकच खळबळ उडाली. उपलब्ध विकास निधी परत जाऊ नये म्हणून नगरसेवकाने हा पवित्रा घेतला. नगराध्यक्षासह मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवकाचे म्हणणे सभागृहात ऐकून घेतले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आर्णी नगर परिषदेची अर्थसंकल्पीय सभा सोमवारी बोलाविण्यात आली होती. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक गणेश हिरोळे यांनी नगर परिषदेच्या हॉलमध्येच स्वत:ला कोंडून घेतले. हा प्रकार माहीत होताच नगराध्यक्ष आरिज बेग, अनिल आडे, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी नगरसेवकाने कोंडून घेतलेल्या हॉलकडे धाव घेतली. त्यावेळी सभागृहात आपले म्हणणे ऐकून घेण्यात येईल, असे आश्वासन हिरोळे यांना देण्यात आले. त्यावरून त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान या आंदोलनाला नगरपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण मुनगीनवार यांनी पाठिंबा दिला. यानंतर नऊ कोटी ५६ लाख ९८ हजार रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यावेळी नगरसेवकांनी किमान आठ दिवस आधी अर्थसंकल्प वाचनाकरिता देण्यात यावा, अशी मागणी केली. वेळेवर दिलेल्या अर्थसंकल्पाच्या प्रती वाचण्यासाठी नगरसेवकांनी वेळ मागितला असता सोमवारची सभा तहकूब करण्यात आली. मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी यावेळी दिलगिरी व्यक्त करीत सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात येईल, असे सांगितले. नगराध्यक्ष आरिज बेग म्हणाले, नगरसेवक हिरोळे यांची समजूत घातली असून योग्य कारवाई केली जाईल. तसेच तहकूब झालेली अर्थसंकल्पीय सभा लवकरच घेण्यात येईल. (तालुका प्रतिनिधी)
आर्णीत सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकाने घेतले कोंडून
By admin | Updated: March 1, 2016 01:57 IST