अशोक काकडे - पुसदविधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरून कोणत्या नेत्याची आपल्या गावात किती पकड आहे, हे स्पष्ट झाले. पक्ष नेता म्हणविणाऱ्या अनेक नेत्यांची मतदारांनी गावातच पोलखोल करत त्यांना धोबीपछाड दिली. पुसद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाच्या नेते, पदाधिकाऱ्यांच्या गावातील आकडेवारी अनेकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मनोहरराव नाईक प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. त्यांच्या विजयात स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. मात्र अनेक गावातील आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची पत किती आहे हे दिसून येते. पुसद नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते राजू दुधे यांच्या वार्डात राष्ट्रवादी, सेना व भाजपा या प्रमुख पक्षांना जवळपास सारखीच मते मिळाली आहे. तर केंद्र क्रमांक १३३ व १३३ अ या केंद्रावर मनोहरराव नाईकांना २० ते २५ चे मताधिक्य आहे. राष्ट्रवादीचे सुभाष चव्हाण, माला बीडकर यांच्या ईटावा वार्डात चार केंद्रांपैकी दोन केंद्रावर शिवसेनेला तर दोन केंद्रावर राष्ट्रवादीला मताधिक्य मिळाले आहे. उदासी वार्ड, तेलगु वसाहत, सुभाष वार्ड, काळा मारोती परिसर, गुजरी, चौबारा, आझाद चौक, लोहार लाईन या भागात वर्चस्व असलेले व मनोहरराव नाईकांच्या प्रचाराचे मुख्य असलेले राष्ट्रवादीचे सतीश बयास आणि त्या परिसरातील बंडु वायकुळे, बाबू तातेवार, प्रकाश पानपट्टे यांच्या तीनही वार्डात शिवसेना आणि भाजपाला मताधिक्य मिळाले आहे. काँग्रेसचे उमेदवार अॅड़ सचिन नाईक यांच्या शिवाजीनगर परिसरातील मतदारांनीही त्यांच्या पारड्यात मत टाकले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे काँग्रेसचे स्विकृत नगरसेवक अजय पुरोहित यांचे याच भागात वास्तव्य आहे. केंद्र क्रमांक १५७, १६०, १६१ या केंद्रावर मनोहरराव नाईकांना ५० टक्केच्यावर मताधिक्य आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक नितीन पवार, राजू साळुंके, गुलाबराव उतळे, प्रवीण नाईक, बाळासाहेब साबळे यांच्या प्रयत्नामुळे ते शक्य झाले, असे सांगितल्या जाते. काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा यांचे प्रभुत्व असलेल्या गढी वार्डात मतदारांनी राष्ट्रवादीला कौल दिला. काँग्रसेचेच डॉ. मोहंमद नदीम यांच्या वसंतनगर परिसरातही राष्ट्रवादी आघाडीवर आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील मतदारांनीही गाव नेत्यांना धोबी पछाड दिल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीेच पदाधिकारी दिलीप पारध यांच्या काकडदातीमध्ये शिवसेनेने आघाडी घेतली. सेनेला ४२५ तर राष्ट्रवादीला ४१६, काँग्रेसला ११५ आणि भाजपाला १९२ मते प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे दिलीप पारध यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. नेहमी नाईकांच्या विरोधात मतदान करणाऱ्या श्रीरामपूरने मात्र यावेळी राष्ट्रवादीला कौल दिला. राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य वर्षा पाटील, सरपंच मिलिंद उदेपूरकर, गुलाबराव नाईक या परिसरात राहतात. पंचायत समितीतील राष्ट्रवादीचे माजी सभापती भगवान भाकरे यांचे बोरी खु. गावात शिवसेनेने तब्बल ३०० मतांची आघाडी घेतली. येथे गावातील राष्ट्रवादी नेत्यांवर असलेली नाराजी दिसून आली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, रवींद्र महल्ले, जैनुल सिद्दीकी, राजू चंदेल, राजेंद्र चव्हाण हे नेतृत्व करीत असलेल्या शेंबाळपिंप्री जिल्हा परिषद गटातून चांगलेच मताधिक्य मनोहरराव नाईकांना प्राप्त झाले. शिवसेनेचे राजेंद्र साकला, काँग्रेसचे गजानन देशमुख यांना आत्मचिंतनाची गरज निर्माण झाली आहे. सेलु सर्कलमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिकराव टारपे आणि सेनेचे उत्तमराव खंदारे यांच्या हर्षी गावातून मनोहरराव नाईकांना आघाडी मिळाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आरती फुफाटे यांच्या बेलोरा गटात राष्ट्रवादीला सात हजार ६८७ मतांची आघाडी मिळाली. तर जांब बाजार सर्कलमधून १० हजार ८३७ मतांची आघाडी मिळाली.
नेत्यांची गावातच पोलखोल
By admin | Updated: October 21, 2014 22:59 IST