एमआयडीसी : १७ भूखंड, जलनिस्सारण प्रकल्पाबाबत संभ्रम यवतमाळ : मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या टेक्सटाईल झोनसाठी यवतमाळच्या भोयर एमआयडीसीतील ९० हेक्टर (२२५ एकर) क्षेत्रात ले-आऊट मंजूर करण्यात आले आहे. तेथे आता उद्योगांची प्रतीक्षा राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी यवतमाळात टेक्सटाईल झोनची घोषणा केली होती. गेली अनेक महिने या झोनसाठीचे कामकाज थंडबस्त्यात असले तरी आता त्याला गती आल्याचे सांगितले जाते. यवतमाळातील लोहारा एमआयडीसीचा विस्तार हा भोयरपर्यंत झाला आहे. तेथे नव्याने एमआयडीसीने भूसंपादन केले आहे. टेक्सटाईल झोनसाठी ९० हेक्टर क्षेत्र आरक्षित करण्यात आले आहे. विशेष असे या ९० हेक्टरमध्ये ले-आऊटही मंजूर झाले आहे. तेथे मोठे उद्योग डोळ्यापुढे ठेऊन १७ भूखंड तयार करण्यात आल्याची माहिती एमआयडीसीच्या सूत्रांनी दिली. टेक्सटाईल झोनच्या दृष्टीने एमआयडीसीने प्राथमिक तयारी केली असल्याने आता तेथे उद्योगांची प्रतीक्षा राहणार आहे. एमआयडीसीने ले-आऊट मंजूर केले असले तरी टेक्सटाईल झोनसाठी ही जागा तर कमी पडणार नाही ना याबाबत यंत्रणेत साशंकता पहायला मिळते. कारण ९० हेक्टरपैकी बरीच जागा ही खुले भूखंड आणि रस्त्यांमध्ये जाणार आहे. शिवाय जलनिस्सारन व शुद्धीकरण केंद्राबाबतही संभ्रम आहे. या केंद्राला किमान सात ते आठ हेक्टर जागा लागणार आहे. यवतमाळच्या टेक्सटाईल झोनमध्ये नेमके उद्योग कशा स्वरूपाचे येतात यावर या केंद्राची आवश्यकता अवलंबून राहणार आहे. येथे जिनिंग प्रेसिंग, कापड तयार करणे यासारखे उद्योग आल्यास या केंद्राची आवश्यकता नाही. परंतु कापडाला रंग देणारा उद्योग येत असेल तरच जल:निस्सारन व शुद्धीकरण केंद्राची आवश्यकता भासणार आहे. कारण या रंग कारखान्यातून निघणारे रसायन मिश्रीत पाणी आधी शुद्ध करून नंतर त्याचा निचरा केला जाणार आहे. किमान झाडांना देण्यायोग्य हे पाणी बनविले जाणार आहे. त्यासाठीच या केंद्राची आवश्यकता राहणार असून त्याचे बजेट अडीच ते तीन कोटी रुपयांचे राहणार आहे. रंग कारखाना न आल्यास हे केंद्र लागणार नाही, पर्यायाने टेक्सटाईल झोनसाठी सात ते ंआठ हेक्टर जागा आणखी उपलब्ध होईल. यवतमाळ प्रमाणेच अमरावतीलासुद्धा टेक्सटाईल झोनचे ्रकाम सुरू झाले आहेत. यवतमाळात दळणवळण सोईचे नसल्याने उद्योजकांची पसंती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या नांदगावपेठ (अमरावती) येथील पंचतारांकित एमआयडीसीला राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) उद्योगांसाठी हवेत आता राजकीय प्रयत्न यवतमाळच्या टेक्सटाईल झोनमध्ये किमान जिनिंग प्रेसिंग, कापड तयार करणारे उद्योग तरी यावे या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. एमआयडीसीने झोन तयार केला असला तरी तेथे उद्योग खेचून आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची ठरणार आहे. कारण आमदारांच्या एका समितीने मूळ यवतमाळात कापूस पिकतोच कुठे असा प्रश्न उपस्थित करून हा टेक्सटाईल झोन कळंब, पांढरकवडा या भागात हलविण्याची सूचना आधीच केली आहे. हा झोन यवतमाळातच थांबविणे आणि तेथे उद्योग खेचून आणण्याचे आव्हान सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या मंत्री, खासदार-आमदारांपुढे राहणार आहे.
टेक्स्टाईल झोनसाठी ९० हेक्टरमध्ये ले-आऊट मंजूर
By admin | Updated: December 21, 2016 23:48 IST