पुसद : माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी पूर्ण न केल्याने एका विवाहितेला विहिरीत ढकलून ठार मारण्याची घटना तालुक्यातील मनसळ येथे बुधवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी विवाहितेचा पती व सासूविरुद्ध गुन्हा नोंदविला. अर्चना गजानन माळकर (३५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मनसळपासून आठ किलोमीटर अंतरावरील शेतात पती गजानन आनंदा माळकर, सासू पार्वताबाई आणि शिवम (४) व शुभम (२) या मुलांसह अर्चना राहत होती. गजानन व पार्वताबाई अर्चनाला माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी त्रास देत होते. ही मागणी पूर्ण न झाल्याने बुधवारी सकाळी ११ वाजता पती व सासूने शेतातील ३० फूट खोल विहिरीत अर्चनाला ढकलल्याचा आरोप आहे. अर्चनाला पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी पती गजानन माळकर, सासू पार्वतीबाई आनंदा माळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
पैशासाठी सासरच्यांनी सुनेला विहिरीत लोटले
By admin | Updated: July 30, 2015 02:12 IST